Advt.

Advt.

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

दिशाचा पहिला जन्म


(मागील प्रकरणावरून पुढे चालू)

दुस-या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो आणि डायरेक्ट विषयालाच हात घातला.

‘दहा वर्षांपूर्वी तू मला जी पत्रे लिहिली होतीस त्यावेळी  मला  वाटलं  होतं  की तुला कांहीतरी दु:ख आहे. तू एकदा लिहिलंही होतेस की तुझ्या दु:खाबद्दल न बोललेलंच बरं .. तू पुनर्जन्मांबद्दल जे बोलतेस तेच तुझं दु:ख आहे ना?’
‘नाही.. त्यावेळी मला एक वेगळंच दु:ख होतं ...’
‘????’
‘माझ्या वडलांना मुलगा पाहिजे होता आणि आजीला नातू. पण माझ्या आईनं  मला जन्म दिला... एका मुलीला.. आय वाज अॅन अनवांटेड चाइल्ड. वडील आणि आज्जी माझ्या आईचा खूप छळ करायचे, मुलीला जन्म दिल्यामुळं.  गेली बिचारी...’
‘सो सॅड.... तुला जन्मोजन्मी भोगावंच लागत आहे... मला खूप वाईट वाटतं ....’
‘म्हणूनच मी कंटाळले आहे सारखा-सारखा जन्म घ्यायला... मला सोडवा यातून.... प्लीज....’
‘तुला सांगितला ना माझा प्रॉब्लेम... पण मी तुझ्यासाठी दुसरं  कांही करता येतंय का ते बघतो’
‘करा लवकर काय करायचं ते.’
‘तू पूर्वी मला जी पत्रं लिहायाचीस त्यात तू पुनर्जन्मांबद्दल कांहीच लिहिलं नव्हतस...’
‘त्यावेळी मला माझे आधीचे जन्म आठवत नव्हते. ते मला अगदी अलीकडं आठवायला लागले. म्हणजे गेल्या वर्षांपासून. कांही आठवड्यांपूर्वी मला असं स्वप्न पडलं  की गेल्या जन्मातले जोरावरसिंह या जन्मात महावीर सांगलीकर म्हणून जन्माला आले आहेत. मग मी तुम्हाला इंटरनेटवर सर्च केले आणि तुम्ही सापडलात’
‘पण जोरावरसिंह म्हणजे मीच आहे याची तुला एवढी खात्री कशी?’
‘खात्री होतीच. आणि त्या स्वप्नात मला तुमचा सध्याचा चेहरा स्पष्ट दिसला होता. नंतर मी तुमचा फोटो मागवला कारण तुमचा फोटो स्वप्नात दिसलेल्या चेहऱ्यासारखा आहे का याची मला खात्री करून घ्यायची होती.
‘समजा जर तो फोटो स्वप्नातल्या चेहऱ्याशी मॅच झाला नसता तर?’
‘मग मी  लगेच ओळखलं  असतं की तुम्ही पाठवलेला फोटो तुमचा नाही. म्हणाले असते, ’मिस्टर महावीर, माझ्याशी खोटेपणा करू नका. सेंड युअर रिअल फोटो...’   

‘गेल्या जन्मातली तुझी जन्मतारीख तुला आठवते का?’
' हो! 26 एप्रिल’
‘साल?’
‘1925’
‘आणि मृत्यू?’
‘1958’
‘आणि जोरावर सिंहाचा मृत्यू 1944-45 च्या दरम्यान झाला असेल... बरोबर?’
‘बरोबर, 1945 साली. पण तुम्ही हे कसे काय ओळखले?’
‘कॉमन सेन्स.. जनरल नॉलेज... पण ते सोड... माझा जन्म 1958 झाला. जोरावर सिंहाच्या
मृत्यूनंतर 13 वर्षांनी. मग या 13 वर्षांच्या काळात जोरावर सिंहाचा आत्मा कोठे होता?’
‘ते मला माहीत नाही. पण कांही आत्मे पुढचा जन्म लगेच घेत नाहीत. किंवा त्यांना लगेच जन्म घेण्यात कांही अडचण येत असावी. माझंच बघा ना... तुमचा जन्म झाल्यावर कांही काळातच मी जन्म घ्यायला पाहिजे होता, पण मलासुद्धा 13 वर्षं  लागली’ 
‘ही तेरा वर्षं  तू काय करत होतीस’
‘गॅप  पिरिअडमधलं  मला कांहीच आठवत नाही, आठवतं  ते जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचं ... प्रत्येक जन्मातलं ’

‘दिशा, मला एक सांग, तू असा किती वेळा जन्म घेतला आहेस?’
‘तुमचा पाठलाग करणारा हा माझा सलग 21 वा जन्म आहे. त्या आधी माझे किती जन्म झाले ते मला आठवत नाही, पण गेल्या वीस जन्मात काय काय घडलं ते मला चांगलं  आठवतं’. 
‘मग त्या वीस जन्मांमध्ये आपली भेट कधीच झाली नाही का?’
‘पहिल्या जन्मात आपली भेट झाली होती. पण नंतर आपली ताटातूट झाली, त्यानंतर प्रत्येक जन्मात आपण या ना त्या प्रकारे एकमेकांच्या संपर्कात आलो, कांहीवेळा दुरून एकमेकांना पाहिलेही, कांहीवेळा प्रत्यक्ष भेटही झाली....’

‘पहिल्या जन्मात नेमकं  काय झालं?’
‘ती एक मोठीच कहाणी आहे...’
‘सांग... आज माझ्याकडं भरपूर वेळ आहे तुझी कहाणी  ऐकायला..’


‘तो काळ आजपासून सुमारे 1000 वर्षांपूर्वीचा होता. त्यावेळी तुम्ही कर्नाटकातील एका बलाढ्य राज्याचे राजकुमार होता. मीही शेजारच्या एका छोट्या राज्यातील राजाची एकुलती एक राजकन्या होते. मला भाऊ नव्हता. माझ्या वडिलांच्यानंतर मीच राज्याची प्रमुख होणार होते. पण माझ्या वडिलांनी दूरदृष्टीने वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी माझे लग्न तुमच्याशी करण्याचे ठरवले. शिवाय आमचे राज्य तुमच्या राज्यात विलीन करायचे ठरवले. माझा या दोन्ही गोष्टींना विरोध होता. पहिले म्हणजे आपले सार्वभौम राज्य दुस-या राज्यात विलीन करणे मला चुकीचे आणि विचित्र वाटत होते. दुसरे म्हणजे तुमच्या राज्याचा राजधर्म शैव होता, तर आमच्या राज्याचा जैन. माझे लग्न तुमच्याशी झाले तर मला शैव व्हावे लागणार..  हीही गोष्ट मला मान्य नव्हती.

त्यावेळी मला माझ्या वडिलांनी समजावून सांगितले, ‘हे बघ पोरी, आपल्या शेजारची कांही राज्ये आपल्या राज्याचा लचका तोडायला टपून बसलेली आहेत. जो पर्यंत मी आहे तोपर्यंत कोणी आपल्या वाटेला जाणार नाही. माझ्यानंतर मात्र आपल्या राज्यावर सगळेजण तुटून पडतील. पण तू जर त्या राजकुमाराशी लग्न केलेस, आपण आपले राज्य त्यांच्या राज्यात विलीन केले, तर कोण कशाला आपल्या वाटेला जाईल?’

वडिलांच्या या म्हणण्याला मी ठाम विरोध केला. मी म्हणाले, ‘मी राज्य सांभाळायला तुमच्या इतकीच समर्थ आहे. तुमचीच मुलगी आहे मी. तुम्ही म्हणता तसे कांही करायची गरज नाही’
‘बघ पोरी. सावकाश विचार कर, आणि मग ठरव काय करायचे ते.’ वडील म्हणाले.

एकदा मी माझ्या कांही सैनिकांबरोबर आमच्या राज्याच्या सीमेवर टेहळणी करत होते.  इतक्यात आमच्यापासून ब-याच अंतरावर एक वाघ शेजारी राज्यातून धावत येत आमच्या राज्यात शिरला. कांही वेळातच चार शिका-यांचे एक टोळके घोड्यांवरून त्याचा पाठलाग करत आमच्या राज्यात घुसले. मी माझ्या सैनिकांसह त्या टोळक्याचा पाठलाग केला. आम्ही त्यांना गाठले तोपर्यंत त्यांनी त्या वाघाची शिकार केली होती. कोणत्याही प्राण्याची शिकार करणे हा आमच्या राज्यात गंभीर गुन्हा होता. मी माझ्या सैनिकांना त्या चौघांना अटक करण्याचा आदेश दिला. त्यांना घेवून आम्ही राजधानीत आलो आणि महाराजांच्या पुढे त्यांना हजर केले....

त्या चौघांपैकी एका तरुणाला पाहून महाराज चमकले. त्यांनी रक्षकांना चौघांच्या बेड्या काढण्याचा आदेश दिला. त्यांच्या पैकी एका तरुणाला मोठ्या सन्मानाने विशेष पाहुण्यांसाठी असलेल्या आसनावर बसण्याची विनंती केली. हे काय चाललेय ते मला कळेना. एवढ्यात महाराजांनी मला आपल्याजवळ बोलवले आणि त्या तरुणाशी माझी ओळख करून दिली. ‘हे आहेत आपल्या शेजारच्या राज्याचे राजकुमार शक्ती सिंह’. मग हळूच माझ्या कानात म्हणाले, ‘ज्याच्याशी तू लग्न करावेस अशी माझी इच्छा आहे, तोच आहे हा राजकुमार’. मी त्याच्याकडे बघितले आणि जरा जोरातच म्हणाले, ‘असोत कुणीही, पण यांनी गुन्हा केला आहे. एक नाही, दोन गुन्हे. पहिला गुन्हा म्हणजे विना परवानगी आपल्या राज्यात प्रवेश केला, दुसरा गुन्हा यांनी एका निरपराध प्राण्याची शिकार केली आहे. आपल्या राज्याच्या कायद्यानुसार यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हीच तर नेहमी म्हणता ना, कायदा सगळ्यांना सारखाच पाहिजे.’

‘तुझे म्हणणे बरोबर आहे. पण आपण या विषयावर नंतर बोलू. तू आता थोडा वेळ विश्रांती घे’ महाराज म्हणाले. हा त्यांचा ‘इथून जा आता’ असा आदेशच होता. मी लगेच तेथून माझ्या महालात निघून गेले. तिकडे महाराजांनी त्या राजकुमाराचा पाहुणचार केला, त्याला भेटवस्तू दिल्या, आणि मोठ्या सन्मानाने स्वत: त्याला सीमेपर्यंत सोडून आले.

या प्रकाराचा मला भयंकर राग आला होता. या राजकुमाराशी लग्न करण्याचा प्रश्नच नव्हता, उलट संधी मिळेल तेंव्हा त्याला आपण अद्दल घडवायचीच असा पण मी केला.

दुस-या दिवशी महाराज स्वत: मला भेटायला माझ्या महालात आले. मी तर रुसूनच बसले होते. त्यांनी माझी समजूत काढली. म्हणाले, ‘हे बघ, कायद्यापुढे सगळे समान असले तरी राजनीती नावाचीही गोष्ट आहे. कांही वेळा पुढचे धोके टाळण्यासाठी इतर राज्यांच्या महत्वाच्या लोकांच्या बाबतीत कायद्यांना मुरड घालावी लागते. समजा, आपण त्या राजकुमाराला शिक्षा केली असती, तर आपले आणि त्या राज्याचे संबंध बिघडले असते. कदाचित त्या राज्याने आपल्या राज्यावर आक्रमणही केले असते. आपण लढा दिला असता, पण यात आपल्या आणि त्या राज्याच्या अनेक सैनिकांचा उगीचच बळी गेला असता’

‘हा तर पलायनवाद झाला,’ मी म्हणाले, ‘अशाने ते लोक माजतील आणि आपल्याला त्यांचा जास्त त्रास होईल’.

‘नाही. आपण त्यांना आळा घालणार आहोत. उद्या आपला एक दूत हा निषेध खलिता घेवून त्या राज्याच्या राजाला देईल’ असे म्हणत महाराजांनी तो खलिता मला वाचायला दिला.

‘महाराजा सोमेश्वर,

कांही दिवसांपूर्वी राजकुमार शक्ती यांनी आमच्या राज्यात येऊन वाघाची शिकार केली, हे आपणास आज पावेतो माहीत झाले असेलच. आमच्या राज्याच्या कायद्यानुसार शिकार करणे हा मोठा अपराध आहे. आमच्या राज्यात विनापरवाना प्रवेश करणे हा देखील अपराध आहे. त्यामुळे आमच्या सैनिकांनी राजकुमारास अटक करून आमच्या पुढे हजर केले होते. पण तुमच्या आणि आमच्या राज्याचे मैत्रीपूर्ण संबंध, तुमची माझी वैयक्तिक मैत्री याचा विचार करून मी राजकुमार शक्ती सिंह यांना  यावेळी क्षमा केली आहे. पण पुन्हा असा प्रकार घडल्यास आम्हाला नक्कीच कारवाई करावी लागेल, याची नोंद घ्यावी

-महाराजा पद्मसेन’ 

या खलित्याचे लगेच उत्तर मिळाले.

‘महाराजा पद्मसेन

जो प्रकार घडला त्याबद्दल मी अतिशय दु:खी आणि दिलगीर आहे. असा प्रकार पुन्हा होवू नये म्हणून मी राजकुमार शक्ति सिंहास ताकीद देत आहे. तरीही असे पुन्हा घडल्यास आपण आपल्या राज्याच्या कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी. आम्ही त्याच्या आड येणार नाही

-महाराजा सोमेश्वर’

कांही दिवसांनी तिकडून आणखी एक खलिता आला. त्यात महाराजा सोमेश्वर यांनी लिहिले होते की राजकुमार शक्ति सिंह याला मी आवडले आहे, आणि त्याची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. हे लग्न झाल्यास महाराजा सोमेश्वर राज्याचा कारभार राजकुमार शक्ती सिंहाकडे सोपवून निवृत्त होणार होते. खलिता वाचून महाराजांना खूप आनंद झाला. पण त्या राजकुमाराशी लग्न करण्यास माझा विरोध होता.

त्यावेळी आमच्या राज्यात आचार्य सुमंतभद्र यांचे आगमन झाले होते. ते खूप ज्ञानी होते. त्यांना कन्नड, तमिळ, महाराष्ट्री, शौरसेनी, अर्धमागधी, संस्कृत अशा अनेक भाषा येत असत. धर्म, तत्वज्ञान, राजनीती, गणित, व्याकरण, आयुर्वेद अशा अनेक विषयांवर त्यांनी खूप ग्रंथ लिहिले होते. त्यांचे हे ग्रंथ त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना खूप उपयोगी पडत. अनेक विद्वान, राजे-महाराजे त्यांचा सल्ला घेत असत, त्यांना मानत असत. ते आमच्या राज्यात बराच काळ विहार करणार होते.

महाराज पद्मसेन यांनी हे सगळे प्रकरण आचार्यश्रींच्या कानावर घातले. एकदा मी आचार्यश्रींचे दर्शन घ्यायला गेले होते. त्यावेळी आचार्यश्रींनी मला फार महत्वाचा उपदेश केला. ते म्हणाले, ‘हे बघ, आपल्या धर्माची तत्वे कितीही उदात्त असली, लोकोपयोगी असली, तरी जर राजाश्रय नसेल तर आपला धर्म वाढू शकत नाही. तू जर त्या राजकुमाराशी लग्न केलेस तर तू त्याच्यात परिवर्तन करू शकतेस. तू त्याला जैन बनवू शकतेस. तो जैन बनला जरी नाही तरी त्याचा जैन धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोण उदार राहील. हे सगळे आपल्या धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे. कारण ते राज्य बलाढय आणि आकारानेही मोठे आहे. ही संधी तू सोडू नकोस. जैन धर्माचा खरा प्रचार हा जैन स्त्रियांच्यामुळेच होत असतो. काय करायचे ते आता तूच ठरवायचे आहे.’

आचार्यश्रींच्या या सल्ल्याचा मी खूप विचार करून महाराज पद्मसेनांना म्हणाले, ’मी या लग्नास तयार आहे. पण त्या आधी मला त्या राजकुमाराची वैयक्तिक भेट घ्यायची आहे.’

मग आमची भेट झाली. सीमेवरील एका नगरीतील विश्राम गृहात. मी त्या राजकुमारास सांगितले, ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. पण माझ्या कांही अटी आहेत. त्या तुम्ही मानणार असाल तरच हे लग्न होईल’
‘काय अटी आहेत आपल्या?’
‘पहिली अटat म्हणजे आमचे राज्य स्वतंत्रच राहील. त्याच्यावर कोणी हल्ला केला तर त्याचे रक्षण करण्यास तेथील सैन्य समर्थ आहे. तरीही गरज पडल्यास तुमच्या राज्याने आमच्या राज्यास मदत केली पाहिजे. आमचे राज्य लष्करी दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे आणि त्याची तुमच्या राज्याला मोलाची मदत होवू शकते. त्यामुळे तुम्ही आमच्या राज्याशी एकमेकांचे संरक्षण करण्याचा करार केला पाहिजे’
‘मान्य... असा करार तुमच्यापेक्षा आमच्याच जास्त  फायद्याचा आहे, कारण आमच्या राज्याला समुद्र किनारा नाही. तुमच्या राज्याला तो आहे, आणि तुमच्याकडे आरमारही आहे’ 
‘दुसरी अट- जैन साधूंच्या विहाराला तुमच्या राज्यात कसलाही अडथळा यायला नको..अगदी दुस-या राज्यातून आले तरी’
‘आत्ता तरी आमच्या येथे कोणाची बिशाद आहे त्यांना अडवण्याची? आमच्या राज्यात जैन साधूंचे आगमन होणे हे आम्ही आमच्या भाग्याचेच समजतो.’
‘तिसरी aअट म्हणजे तुम्ही शिकार करणे सोडून दिले पाहिजे’
‘ती मी कधीच सोडून दिली. तुमच्या राज्यात मागे केलेली शिकार ही माझी शेवटची शिकार होती’
‘चौथी अट- तुमच्या राज्यात शिकारीवर बंदी घालायला पाहिजे’
‘मान्य’
‘पाचवी अट: तुम्ही शाकाहारी व्हायला पाहिजे’.
‘मी शाकाहारीच आहे.. पहिल्यापासून... पुढची अट....?’

त्या राजकुमाराने माझ्या सगळ्याच अटींमधली हवा काढून घेतली होती. मग मी आणखी एक अट atघातली..
‘आता महत्वाची आणि शेवटची atअट... तुम्ही जैन बनायला पाहिजे’
‘हे मात्र मला जमणार नाही. जैन धर्माबद्दल मला आदर आहे, पण धर्मांतर....? नाही जमणार’
‘ठीक आहे. ही अट मी मागे घेते. पण मग त्या ऐवजी माझी दुसरी अट आहे...’
‘कोणती?’
‘तुमच्या राज्याचा धर्म विषयक विभाग मला सांभाळायला दिला पाहिजे’
‘मिळेल, पण तुम्ही कोणत्याही धर्माच्या बाबतीत पक्षपात करता कामा नये’
‘नाही करणार. आणखी एक सांगायचे होते..’
‘काय?’
‘ तुम्ही जैन बनायला नकार दिला असला तरी माझ्या सहवासात तुम्ही एक ना एक दिवस जैन बनणार... मी तुम्हाला जैन बनवणार, ही प्रतिज्ञा आहे माझी’
‘अशीच प्रतिज्ञा मीही केली तर? म्हणजे मी तुम्हाला शैव व्हायला भाग पाडणार वगैरे’
‘करा की, बघुया कोण जिंकतंय ते...’ 
‘बघूया’
‘पण आत्ता तुम्ही ज्या अटी मान्य केल्या त्या पाळालच याची शाश्वती काय?’
‘मी शब्दांचा पक्का आहे. एकदा दिलेले वचन मी प्राण गेला तरी बदलत नाही....’
‘ठीक आहे’
‘आता मी तुम्हाला तू म्हंटले तर चालेल ना?’
‘चालेल’
‘तू मला आवडतेस.... पण मी तुला आवडलो का?’
‘खरं सांगू?... अजून तरी नाही.... आणि एक विचारू...?’
‘काय?’
‘मी आजपर्यंत सतत तुमच्या विरोधात वागले.... तरीही मी तुम्हाला आवडले, हे कसे काय?’
‘हे मलाही अजून कळले नाही’    

(पुढे चालू ....)




या आधीची कथा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा