Advt.

Advt.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन


 (मागील प्रकरणावरून पुढे चालू)

‘इंटरेस्टिंग स्टोरी... मला तर वाटत होते की माझ्या डोळ्यासमोरच सगळ्या घटना घडत आहेत……. पण आख्ख्या स्टोरीत तू तुझं  नाव नाही सांगितलंस .. नुसतं मी, मी करत होतीस...'

'त्यावेळी माझे नाव निर्भया देवी होतं'

' निर्भया देवी, मग पुढं  काय झालं?’ मी विचारलं.

दिशानं तिच्या पहिल्या जन्मातील उरलेली गोष्ट सांगायला सुरवात केली....

‘ठरल्याप्रमाणं माझं लग्न शक्तीसिंहासी झालं. हे लग्न झाल्यावर लगेच महाराजा सोमेश्वर गादीवरून पायउतार झाले. शक्तीसिंहाचा राज्याभिषेक करण्यात आला.

त्या राज्यात शैवांची लोकसंख्या सर्वात जास्त होती. त्या खालोखाल वैष्णवांची आणि जैनांची संख्या होती. राजा शैव, राणी जैन या गोष्टीची प्रजेत वेगवेगळ्या प्रकारे चर्चा झाली. शैव समाजाला याचं कांही विशेष वाटलं नाही. जैन समाजात अनेकांना या गोष्टीचा आनंद झाला, तर कांही जणांना ते खटकलं देखील. पण वैष्णव समाजाला हे फारच खटकलं. शैव राजा, जैन राणी ही गोष्ट वैष्णव धर्माला धोकादायकच असं वैष्णवांच्या धुरिणांना वाटू लागलं. 

ठरल्याप्रमाणं राज्याचा धर्मविषयक विभाग माझ्या देखरेखीखाली आला. कोणताही भेदभाव न करता मी धार्मिक तंटे सोडवू लागले, धर्मादाय करू लागले. पण वैष्णवांना वाटे की मी शैवांना आणि जैनांना झुकते माप देत असते.

एका मंदिरावरून जैन आणि वैष्णव यांच्यात तंटा होता. तो माझ्याकडं  आला. जैनांची बाजू योग्य होती असं स्पष्ट दिसत होते. पण मी जर तसा न्याय दिला असता तर मी जैनांची बाजू घेते असा अर्थ वैष्णवांनी घेतला असता. म्हणून मी ते प्रकरण महाराजा शक्तीसिंह यांच्याकडं  पाठवलं व त्यांनीच त्याचा निवाडा करावा असं सुचवलं. महाराजा शक्तीसिंह यांनी जैनांच्या बाजूनं निकाल दिला. वैष्णवांना आता वाटू लागलं की महाराजा शक्ती सिंह जैनांची बाजू घेतात, कारण त्यांची राणी जैन आहे. किंवा राजानं दिलेला निकाल राणीच्या म्हणण्यानुसारच असावा.

मग वैष्णवांनी आपल्या हस्तकांमार्फत शैव समाजात अशा अफवा सोडायला सुरवात केली की महाराजा शक्ती सिंह जैन धर्माच्या बाजूला झुकले आहेत, आणि लवकरच ते शैव धर्म सोडून जैन धर्म स्वीकारणार आहेत. अनेक शैवांना ते खरंही वाटले. पण शैवांचे धुरीण खरं काय आहे ते जाणून होते.

एकदा महाराजा शक्ती सिंह शैवांचे एक महान गुरू महासिद्ध यांना भेटायला गेले होते. त्यावेळी महासिद्ध यांनी महाराजा शक्ती सिंहास असं सुचवलं की जैन गुरु आचार्य सुमंत भद्र हे गेली बरीच वर्षं झाली, आपल्या राज्यात आलेले नाहीत, त्यांना या वर्षी आपल्या राजधानीत चातुर्मास करण्यासाठी आमंत्रित करावं. महाराजा शक्ती सिंह यांना ही गोष्ट योग्य वाटली. शेजारच्या एका राज्यात विहार करीत असलेल्या आचार्य सुमंत भद्र यांना ते स्वत: जावून भेटले आणि त्यांना आपल्या राज्यात चातुर्मासासाठी येण्याचे आमंत्रण दिले. आचार्यश्रींनी ते स्वीकारलं देखील.

ही बातमी राज्यात सर्वांना कळाली. या बातमीमुळं  वैष्णवांचे धुरीण हादरले. त्यांची पक्की खात्री झाली की  महाराजा शक्ती सिंह जैन झाले आहेत. त्यामुळंच त्यांनी सुमंत भद्र यांना आपल्या राज्यात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. जर आचार्य सुमंत भद्र या राज्यात खरोखरच आले तर जैन धर्माची प्रभावान होऊन वैष्णवांचं आणखीन खच्चीकरण होणार होतं.

पुढं पावसाळ्याच्या आधी  आचार्य सुमंत भद्र यांचं राज्यात आगमन झालं. त्यांच्या स्वागताला स्वत: महाराजा शक्ती सिंह, गुरू महासिद्ध, इतर अनेक शैव धर्मगुरू, राज्याचे महामंत्री आणि  मी स्वत: हजर होते. स्वागत समारंभाला येण्यासाठी आम्ही कांही वैष्णव धर्मगुरूंना पण आमंत्रण दिलं होतं, पण तिकडून कोणीच आलंनाही.

आचार्य सुमंत भद्र यांचा चातुर्मास सुरू झाला. त्यांची प्रवचनं ऐकायला समाजातील सर्व थरातील लोक मोठ्या संख्येनं येवू लागले. अनेक विद्वान त्यांच्याशी चर्चा करायला येवू लागले. वैष्णव समाजातील लोकही प्रवचन ऐकायला मोठ्या संख्येनं येत असत.

एके दिवशी शैव गुरू महासिद्ध यांनी  वैष्णवांचे एक प्रसिद्ध धर्मगुरू आणि विद्वान रामाचार्य यांना निरोप पाठवला की तुम्ही व आचार्य सुमंत भद्र यांच्यात जाहीर शास्त्रार्थ व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपला होकार कळवावा. रामाचार्य यांना हा निरोप मिळताच त्यांचे धाबे दणाणले. असा शास्त्रार्थ झाला तर सुमंतभद्रांच्या पुढं आपण टिकू शकणार नाही हे रामाचार्यांना पक्कं माहीत होतं.  आपला पराभव तर होणारच, पण त्यामुळं राज्यातील वैष्णव धर्माचं महत्व आणखी कमी होणार ही गोष्ट ते जाणून होते. महासिद्ध यांना आपला होकार तर कळवायचा, पण कांहीही करून हा शास्त्रार्थ होवू द्यायचा नाही असं रामाचार्य यांनी मनोमन ठरवलं.

एका  रात्री पहाटेच्या सुमारास मला एक विचित्र स्वप्न पडलं. भर दुपारी डोक्यावर तळपणारा तेजस्वी सूर्य वेगानं पश्चिमेकडं जावू लागला आणि कांही क्षणातच त्याचा अस्त झाला. त्यानंतर अंधार झाला आणि आकाशात ग्रह-तारे चमकू लागले. थोड्या वेळानं एक तेजस्वी तारा आणखी तेजस्वी झाला आणि निखळून पडला. त्यानंतर आणखी कांही तारे निखळले. हे कांहीतरी भयसूचक आहे याची मला जाणीव झाली, पण या स्वप्नाचा नेमका अर्थ मला त्यावेळी कळला नाही. त्यादिवशी सकाळी प्रवचन संपल्यावर मी आचार्य समंत भद्रांना भेटले आणि मला पडलेलं स्वप्न त्यांना सांगितलं. ते म्हणाले, 'मुली, तुझ्या स्वप्नाचा अर्थ मला माहीत आहे. पण ते सांगून मी तुला काळजीत टाकणार नाही. पुढं जे कांही होणार आहे ते कुणीच टाळू शकणार नाही. जे होईल ते पहात रहा'. असं म्हणून त्यांनी मौन धारण केलं.

या घटनेला दोन दिवस झाले. त्या दिवशी आचार्य सुमंत भद्र यांचं प्रवचन संपल्यावर एका तरुणानं त्यांच्यापुढं  साष्टांग दंडवत घातला. मग तो  उठून उभा राहिला तेंव्हा त्याच्या हातात एक तळपता सुरा होता. कुणाला कांही कळायच्या आतच त्या तरुणानं आचार्यांच्या छाती व पोटावर सपासप वार केले. आचार्य जागेवरच गतप्राण झाले. तो तरूण पळून जाण्याच्या तयारीत होता, पण त्याला लगेच पकडण्यात आलं. त्याचं कपाळ आणि दंडावर असलेल्या  भस्मावरनं  तो शैव होता असं दिसत होतं. एका शैव तरुणानं जैन आचार्य सुमंत भद्र यांची हत्या केली ही बातमी सगळीकडं  वाऱ्यासारखी पसरली. राजधानीत शैव आणि जैन यांच्यात दंगली सुरू झाल्या. दोन्हीकडच्या हजारो लोकांची कत्तल झाली. दंगलीचं हे लोन राज्यभर पसरलं. कित्येक लोक राज्य सोडून निघून जावू लागले.

त्या तरुणाच्या चौकशीत लवकरच असं उघडकीला आले की तो शैव नव्हता, तर शैव तरुणाच्या वेशात आलेला एक कट्टर वैष्णव तरूण होता. आचार्य सुमंत भद्र यांची हत्या करण्याची जबाबदारी त्याच्यावर खुद्द रामाचार्य यांनी सोपवली होती. हे सत्य उघडकीला आल्यावर महाराजा शक्तीसिंह भयंकर चिडले. रामाचार्य आणि इतर अनेक वैष्णव धुरिणांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं. वैष्णवांच्या हालचालींवर, अधिकारांवर अनेक बंधनं लादण्यात आली. जनतेलाही सत्य कळून चुकलं होतं. आता शैव आणि जैन एकत्र आले आणि त्यांनी आपला मोर्चा वैष्णवांच्याकडं  वळवला. कित्येक वैष्णवांची घरं जाळली गेली, कित्येकांना हाकलून देण्यात आलं. महाराजा शक्ती सिंह यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण राज्यात महिनाभर अशांतताच होती.

एके दिवशी सकाळी-सकाळी महाराजा शक्ती सिंह राज्यातील एका दंगलग्रस्त गावाची पहाणी करण्यासाठी गेले असताना त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली. ही धक्कादायक बातमी माझ्यापर्यंत येते ना येते तोपर्यंत एका गुप्तहेरानं मला येवून सांगितलं की ते अंगरक्षक सेनापती राघवचे विश्वासू सैनिक होते आणि आत्ता पर्यंत राघवनं राजधानीतील महत्वाची ठिकाणं ताब्यात घेतलीत,  रामाचार्य आणि इतर वैष्णवांना त्यानं तुरुंगातून सोडून दिलंय आणि  महासिद्ध यांना तुरुंगात डांबलंय. आता काय करायला पाहिजे याचा मी विचार करत असतानाच आणखी एक गुप्तहेर आला आणि म्हणाला की सेनापती राघव आपल्या सैन्यासह राजवाड्यावर चाल करून येत आहे. हे दोन्ही गुप्तहेर माझे अत्यंत विश्वासू होते. मी त्यांना आणि राजवाड्यातील आमच्या सैनिकांना कांही सूचना दिल्या. मग कांही निवडक साथीदारांसह मी गुप्त भुयारी मार्गानं तिथनं  निघून गेले.  

राघवच्या हालचालीची माहिती मला मिळत होतीच. संध्याकाळपर्यंत राघवनं राजवाड्याचा ताबा घेतला होता.

त्याच दिवशी रात्रीची  वेळ. ज्या भुयारी मार्गानं मी बाहेर गेले होते, त्याच भुयारी मार्गानं 50 विश्वासू सैनिकांसह राजवाड्यात शिरले. सेनापती राघव सिंहासनावर बसला होता. कोणाला कांही कळायच्या आत माझ्या धनुष्यातून सुटलेल्या बाणानं त्याच्या छातीचा वेध घेतला. जोरात ओरडत तो खाली कोसळला. त्याचे बाकीचे लोक, सैनिक सैरावरा पळू लागले. माझ्या सैनिकांनी त्यांची धरपकड सुरू केली.

सेनापती राघव मेल्याची बातमी त्याच्याशी एकनिष्ठ असलेल्या राजावाड्यांबाहेरील सैनिकांमध्ये पसरली. ते हतबल झाले. त्या हजारो सैनिकांनी माझ्या मूठभर सैनिकांपुढे शरणागती पत्करली. तोपर्यंत राज्याशी एकनिष्ठ असणाऱ्या फौजाही राजधानीत पोहचल्या होत्या. सकाळी सुरू झालेलं सेनापतीचं बंड रात्री आम्ही मोडून काढलं.

गुरू महासिद्ध यांना तुरुंगातून सन्मानानं  मुक्त करण्याचा व रामाचार्य आणि इतर वैष्णव गुरुंचा शोध घेण्याचा आदेश मी दिला. पुढं  असं  कळलं  की रामाचार्य आपल्या अनुयायांसह राज्य सोडून पळून चालले असताना एका जंगलात विषारी साप चावून मेले.

शक्ती सिंहाशी माझं लग्न झाल्यावर केवळ एकच वर्षात या सगळ्या भयानक घटना घडल्या. हे सगळं माझ्यामुळं घडलं होतं असं मला वाटायला लागलं.  माझं मन मोकळं करायला  मी गुरू महासिद्ध यांना भेटायला गेले.

‘मी या राज्यात आल्यापासून अनेक वाईट घटना घडल्या. हजारो लोक मेले, परागंदा झाले. राज्याचं  मोठं  नुकसान झाले. माझा पायगुण कांही चांगला नाही असं मला वाटतं. महाराज शक्ती सिंह सुरवातीला मला फारसे आवडले नव्हते. त्यांच्याशी लग्न करण्यात माझे वेगळेच हेतू होते. लग्नानंतर माझा वेळ धर्मकारणात आणि महाराजांचा वेळ राज्य कारभारात गेला. आम्हाला एकमेकांना जाणून घ्यायलाही सवड मिळाली नाही. राज्यात जे कांही वाईट घडले त्याला मीच जबाबदार आहे असं  मला वाटतं. मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय.  मला प्रायश्चित घ्यायchm आहे’, असं म्हणून मी जोरजोरात रडू लागले.

‘हे बघ पोरी, यात तुझा  दोष नाही. तुझे  हेतू वेगळे होते  तरी ते वाईट नव्हते. आणि राज्यात जे कांही हत्याकांड घडलं त्याला तू जबाबदार नसून मी जबाबदार आहे’.

‘तुम्ही?’ मी आश्चर्याने विचारलं, ‘ते कसं काय?’

‘आपल्या राज्यातील वैष्णव मला पहिल्यापासून सलत होते. त्यांचा काटा काढण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करत होतो. त्यातूनच मला एक योजना सुचली. मग मी महाराजा शक्ती सिंह यांना आचार्य सुमंतभद्र यांना राज्यात यायचं निमंत्रण देण्याचा सल्ला दिला.  रामाचार्य यांच्यावर दडपण आणणं हा माझा पहिला हेतू होता. पुढं  रामाचार्य आणि सुमंतभद्र यांच्यात शास्त्रार्थ घडवून आणायची माझी योजना होती. असा शास्त्रार्थ झाला तर रामाचार्य हरणार याची मला पक्की खात्री होती. त्यामुळं  रामाचार्यांचं आणि वैष्णवांचं  महत्व कमी होणार होतं. पण झालं भलतंच. हे कारस्थान माझ्या आणि शैवांच्या अंगलट आलं. आचार्य सुमंतभद्र आणि शक्ती सिंह यांची हत्या झाली. हजारो लोक मेले, बेघर झाले. खरं म्हणजे मलाच आता प्रायश्चित घ्यावं  लागेल. तुझं जे वैयक्तिक नुकसान झालं ते तर कशानंही भरून येवू शकत नाही. तरी पण पोरी शक्य झालं मला माफ कर’

हे ऐकून काय बोलावं ते मला कळेना. महासिद्ध  यांनी असं केलंय हे मला दुसऱ्या कोणीतरी सांगितलं असतं तर मी त्यावरविश्वास ठेवला नसता.  पण हे त्यांनी स्वत:च सांगितलं होतं. थोडा वेळ मौन राहून मी म्हणाले, ‘महाराज,  तुम्ही जे केलं  त्याच्यामागं तुमचा वैयक्तिक स्वार्थ कांहीच नव्हता. तुमच्यावर राग काढून मी आणखी कर्मबंध करून घेणार नाही. मला या सगळ्यातून बाहेर पडायचं  आहे. आता वाटतं  की मी या सगळ्या धार्मिक फंदात न पडता फक्त राणी म्हणून जगले असते तर बरं झालं असतं.’ असं म्हणत मी त्यांना नमस्कार केला आणि तिथनं निघाले.

त्यानंतर माझे बरेच दिवस बेचैनीत गेले.

एके दिवशी अचानक बातमी आली की गुरू महासिद्ध यांनी मठातल्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ते अशा प्रकारे प्रायश्चित घेतील असं  मला स्वप्नातही वाटलं  नव्हतं .

या सगळ्या घटना डोकं फिरवणाऱ्या होत्या. पुढं आपल्याला आणखी काय काय पहायला लागणार कुणास ठाऊक असं  मला वाटू लागलं. माणसाला जर त्याच्या जन्मात दु:खच बघायला लागणार असेल तर त्या जन्माचा उपयोग काय? आपणही आपलं  जीवन संपवावं की  काय?  आत्महत्या करायची? पण आत्महत्या करणं पाप आहे. मग काय करायचं ?

एके रात्री माझ्या स्वप्नात गूढ आवाजातील संदेश आला. ‘ही तुझी शेवटची रात्र आहे. आता तुला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. महाराजा शक्ती सिंह ज्या रुपात ज्या कोणत्या ठिकाणी जन्माला आले असतील, तिथं  त्यांना गाठायचं  आहे. मग तुम्हाला एक प्रेममय जीवन जगायचं  आहे......’

त्यानंतर थोड्याच वेळात कसलाही त्रास न होता झोपेतच मी माझा तो देह सोडून दिला.

पुढे चालू...




आधीचे भाग:
 

1 टिप्पणी:

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा