Advt.

Advt.

Wednesday, June 4, 2014

अंजलीना ब्यांडची कथा

 -महावीर सांगलीकर 
8149703595



फादर जोसेफ ब्यांड यांना विल्यम नावाचा मुलगा होता.   तरुणपणी शिक्षणासाठी  तो कलकत्ता इथं होता. भारताचा प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास हा त्याचा अभ्यासाचा विषय होता. अभ्यासासाठी  कलकत्त्याच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये तो नेहमी जात असे.  तिथं जर्मनीवरून एक तरुणी भारतीय धर्मांच्या इतिहासाचा  अभ्यास करण्यासाठी येत असे.  तिची विल्यमबरोबर चांगलीच गट्टी जमली.

पुढं विल्यमला पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विल्यमनं त्या जर्मन तरुणीस पुण्याला बोलावून घेतले. तिलाही पुण्यातच नोकरी मिळाली.

लवकरच त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलीचं  नाव अंजली असं भारतीय  पद्धतीचं ठेवण्यात आलं. सर्व काही ठीक चाललं  असतानाच पहिलं महायुद्ध सुरू झालं. इंग्लंड आणि जर्मनीचे संबंध बिघडल्यामुळे विल्यम आणि त्याच्या बायकोचे संबंधही  बिघडले. एके दिवशी तिनं नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मुलीला घेवून ती जर्मनीला निघून गेली. मुलगा मात्र इथे पुण्यातच राहिला. त्याचं नाव जेम्स. जेम्स ब्यांड.  तो तो नव्हे. आपणाला माहीत आहे त्या दुस-याचे  नाव जेम्स बॉन्ड  होते. हा जेम्स ब्यांड होता. उच्चारातील फरक आपल्या ध्यानात आलाच असेल. शिवाय जेम्स बॉन्ड हा 007 होता. जेम्स ब्यांड मात्र आपल्या नावापुढे कधीच आकडे लावत नसे. असो.

तर अशा या जेम्स ब्यांडची आई त्याला आणि त्याच्या बापाला सोडून जर्मनीला निघून गेली तेंव्हा तो अवघा 16 वर्षांचा होता. ते त्याचं Matriculationचे वर्ष असल्यानं विल्यमनं पुण्यातल्यालच एका शिक्षिकेशी लग्न केलं. आपल्या नव्या आईच्या कडक शिकवणीमुळं  ब्यांड चांगल्या मार्कानं पास झाला. त्यानंतर त्याला विल्यमनं इंग्लंडमधल्या रॉयल मिलिटरी अकादमीत पाठवलं. तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर जेम्स लवकरच भारतात परतला आणि सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाला. त्यावेळी पहिलं महायुद्ध चालू होतं. त्याची युद्धावर जाण्याची इच्छा होती, पण तो सैन्यात दाखल व्हायला आणि युद्ध संपायला एकच गाठ पडली. त्यामुळं त्याची पराक्रम गाजवायची इच्छा त्यावेळी अपूर्णच राहिली. असो.

तिकडं जर्मनीत त्याची बहिण अंजली ब्यांड इंगजी हा स्पेशल विषय घेवून पदवीधर झाली. मग तिनं अनेक छोटेछोटे कोर्सेस केले. ती शिवणकामही शिकली. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्यानं ती टाईपरायटर चालवायला शिकली. ती टायपिंग इतक्या वेगानं करत असे की ती वापरत असलेले भारीभक्कम टाईपरायटर देखील कांही दिवसातच खिळखिळे होत असत.

मग तिनं नोकरी शोधायला सुरवात केली. लवकरच तिला  एका मोठ्या कंपनीत छोटीशी   नोकरी मिळाली. पण तिचं मन कांही तिथं रमेना. पुढं ती  नोकऱ्या बदलत राहिली. पण तिला मनाजोगती नोकरी कांही मिळेना. तेंव्हा ती स्यांग ली  नावाच्या एका चीनी न्यूमरॉलॉजिस्टकडं सल्ला घ्यायला गेली. त्यासाठी तिला चीनला जावं लागलं नाही, कारण स्यांग ली हा जर्मनीला नेहमी भेट देत असे. चक्क हिटलर देखील त्याच्याकडून सल्ला घेत असे. असो. स्यांग लीनं  तिच्या नावात दोष असल्याचं सांगून नाव किंवा स्पेलिंग बदलायला सांगितले. तसं केल्यावर तिला महिनाभरात एक 'लई भारी' नोकरी मिळेल असं त्यानं सांगितलं. त्याच्या सल्ल्यानुसार तिनं आपलं नाव  अंजलीना असं करून घेतलं.

......आणि काय आश्चर्य... स्यांग लीनं सांगितल्याप्रमाणं थोड्याच दिवसात कुणाला कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी तिला नोकरी मिळाली. तिला तशी नोकरी मिळावी म्हणून आणि स्यांग ली चे शब्द नेहमी प्रमाणे खरे ठरावेत म्हणून की काय,  जर्मनीवर युद्धाचे ढग जमू लागले. वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरभरती सुरू झाली. एके दिवशी अंजलीनानं  एका जर्मन पेप्रात वाचले की जर्मन सरकारच्या मुख्यालयात स्टेनो-टायपिस्टांची भरती चालू आहे. तिनं लगेच टायपिस्टच्या  नोकरीसाठी  एक अर्ज अक्षरश: खरडला. (आजही हा अर्ज जर्मन सरकारच्या अर्काइव्हजमध्ये पहायला मिळतो. त्याच्यावर जोरात खरडल्याच्या खुणा आहेत.  कधी गेलात तर पाहून घ्या. असो ). कांही दिवसातच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आलं. ती  वेळेआधी पाच मिनिटं  इंटरव्ह्यूच्या ठिकाणी  पोहचली. तिथं इंटरव्ह्यूसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंजलीना सुंदर होती, पण तिच्यापेक्षा खूपच सुंदर तरुणी रांगेत उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यामुळं  इथं कांही आपला निभाव लागणार नाही याची तिला  पक्की खात्री झाली. ती परत फिरणारच होती, तेवढ्यात चक्क तिच्या नावाचा पुकारा झाला. दोन गार्ड तिच्याकडं आले आणि त्यांनी तिला चक्क सॅल्यूट  ठोकला! ते तिला अदबीनं इंटरव्ह्यू  केबिन कडं घेवून गेले. तिथल्या वॉचमननेही तिला सॅल्यूट  ठोकला आणि तिच्यासाठी अदबीनं केबिनचं दार उघडलं.. तिला कळेनाच की हे लोक आपल्याशी एवढ्या अदबीनं का वागत आहेत. त्या विचारातच ती केबिनमध्ये  शिरली आणि तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावारच उरला नाही. तिथं  इंटरव्ह्यू घेण्यासाठी तीन तरुण बाया बसल्या होत्या आणि त्या तिघीही अंजलीनाच्या हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या वर्गमैत्रिणी होत्या. त्यातली मधल्या खुर्चीवर बसलेली बया तर हिची खास मैत्रीण होती. कोण असावी बरं ती? ती तर चक्क इव्हा ब्राऊन होती. हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन. ही आपला इंटरव्ह्यू घेणार?

त्या तिघी उठून उभ्या राहिल्या आणि धावतच तिच्याकडं  आल्या. सगळ्यांनी तिला  आळीपाळीनं मिठ्या मारल्या. मग त्या तिघी आपापल्या खुर्चीत जाऊन बसल्या. मैत्रिणीच्या भूमिकेतून बॉसच्या भूमिकेत शिरल्या. अंजलीनाला समोरच्या खुर्चीत बसण्याची ऑर्डर देण्यात आली. इव्हानं फाईलमधून अंजलीनाचा अर्ज बाहेर काढला. म्हणाली, 'तुझा जन्म इंडियात झाला आहे. इंडिया इंग्लंडच्या ताब्यात असल्यानं इंग्लंडसारखाच जर्मनीचा शत्रू आहे. मग तुला आम्ही कशी काय नोकरी देणार?'

हे ऐकून अंजलीनाचा चेहरा पडला. तेवढ्यात  इव्हा म्हणाली, 'पण आम्ही तुझी पूर्ण चौकशी केली आहे. तुझी आई तुझ्या बापाशी भांडून भारतातून तुझ्यासह इइकडं निघून आली. भांडणाचं कारणही तुझ्या आईचं देशप्रेम हेच होतं. तुलाही ते असणारच याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं  आम्ही तुला नोकरी देत आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. टायपिंग जरा स्लो करत जा. आणि पेननं लिहितानादेखील खरडत जावू नकोस. नीप आणि कागद दोन्ही खराब होतात. हा अर्ज बघ तुझा, किती ठिकाणी चक्क फाटला आहे. एक तारखेपासून रुजू हो. चल जा आता.'

'धन्यवाद' ती  म्हणाली, 'पण मला एका प्रश्नाचे उत्तर मिळालं तर बरं होईल'
'काय?'
'माझ्या आई-बाबांचं भांडण झालं, आणि ते का झालं, हे तुम्हाला कसं काय  कळलं? माझी आई तर ते कुणालाही सांगत नाही. आख्ख्या जर्मनीत तर ही गोष्ट फक्त माझ्या आईला आणि मलाच माहीत आहे असं मी आत्तापर्यंत समजत होते'
' ही माहिती मिळवणं कांही अवघड नाही. तुझे बाबा पुण्यात ज्या कॉलेजमध्ये शिकवतात, तिथं एक जर्मन विद्यार्थिनी आहे. तिनं मिळवली ही माहिती आमच्यासाठी. डायरेक्ट तुझ्या बाबांच्याकडून. आणि तुझा भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी आहे हेही आम्हाला माहीत आहे.'

हे ऐकून अंजलीना गारच झाली. आता गरमागरम चहा किंवा कॉफी घेतलीच पाहिजे असं तिला वाटू लागलं. ती बाहेर पडणारच होती, तेवढ्यात इव्हा म्हणाली, थांब, कॉफी पिऊन जा!

(माझ्या आगामी 'ब्यांड बाजा' या पुस्तकातील एका प्रकरणातील तुकडा ) 

हेही वाचा:

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा