Advt.

Advt.

मंगळवार, १५ जुलै, २०१४

हिटलरची गुप्त भारतभेट

-महावीर सांगलीकर


ही गोष्ट दुसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीच्या काळातली आहे.

फारसे प्रसिद्ध नसलेले क्रांतिकारक दादासाहेब राव  यांना ते इंग्रजांच्या विरोधात लढवत असलेल्या शक्कलांच्यामुळे  इंग्रजांनी अटक करून लंडन इथं ठेवलं होतं . पण दादांनी एक डावपेच म्हणून इंग्रजांची चक्क माफी मागितली. इंग्रजांनीही एक डावपेच म्हणून त्यांना सोडून दिलं. त्याचं काळात जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात युद्ध सुरू झालं होतं.

लंडनमधनं सुटल्यावर दादा  चिपळूण इथं  रहायला आले.  तिथं  असताना इंग्रजांना दिलेल्या 'मी परत इंग्रजांविरुद्ध कांही करणार नाही' या  वचनाला जागून ते स्वस्थ बसून राहिले. पण हा त्यांचा एक डाव होता. इंग्रजांना  चकवून त्यांनी जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्याशी गुप्त पत्रव्यवहार केला. त्यांनी लिहिलं होतं की प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये वेगळ्या प्रकारची भयानक शस्त्रे बनवण्याची माहिती आहे. ही माहिती जर्मनीला इंग्लंडच्या विरोधातील लढाईत उपयोगी पडू शकेल.

एका महत्वाच्या पत्रात दादांनी हिटलरला चिपळूणला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्या आमंत्रणाला मान देवून हिटलर एकेदिवशी U-108 या पाणबुडीतून चिपळूणच्या किनाऱ्यावर अवतरला.

दादांच्या घरावर इंग्रजांची नजर होती. त्यामुळं दादांनी हिटलरला जी पत्रे लिहिली होती, त्यातल्या एका पत्रात हिटलरनं त्यांच्या घरी येताना कसं यायचं याच्या खास सूचना केल्या होत्या. त्या सूचनांनुसार हिटलरनं चक्क आपली अर्धीमुर्धी मिशी देखील काढून टाकली होती, डोक्याचं मुंडण केलं होतं, शेंडी राखली होती. धोतर-पंचा नेसला होता आणि दिसेल असं जानवं घातलं होतं. त्यामुळं तो चक्क एखादा कोकणस्थ ब्राम्हण वाटत होता. त्याच्याबरोबर हिमलर, गोबेल्स, रोमेल वगैरे मंडळीही होती. त्यांनीही आपला वेश याच प्रकारचा केला होता. त्यामुळं  दादांच्या घरावर नजर ठेवून असणाऱ्या इंग्रजांच्या भारतीय पोलिसांना कसलाही संशय आला नाही. नेहमी कार्यकर्ते भेटायला येतात तसेच  हे कोणी तरी असावेत असं त्यांना  वाटलं.

दादा आणि या जर्मन मंडळीची एका बंद खोलीत गुप्त मीटिंग झाली. त्यावेळी  दादांनी  जर्मनांना सांगितले की तुम्ही आणि आम्ही आर्यवंशीय आहोत, त्यामुळे आपण एकमेकाचे भाऊ-भाऊ आहोत. आर्यवंशावरच्या या संकट काळात तुम्हाला मदत करणे  हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला इंग्रजांविरुद्धच्या युद्धात खूप उपयोगी पडेल असे गुप्त तंत्रज्ञान देणार आहे.

या मीटिंगमध्ये  दादांनी  वेदातील अणुबॉम्बचं तंत्रज्ञान हिटलरला समजावून सांगितलं. अणुस्फोटाचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं. दादांनी फडताळातून  एक प्राचीन ग्रंथ काढला आणि एका शब्दाच्या अनुस्वारात लपवून ठेवलेला एक अणु अलगद बाहेर काढला.  त्या  अणुचा वैदिक पद्धतीनं प्रत्यक्ष  स्फोटही करून दाखवला.  त्या एकाच अणुचा स्फोट इतका जबरदस्त होता की तिथे उपस्थित सगळ्यांना भूकंप झाला की काय असं वाटले. 

हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी चिपळूणमध्ये पाऊल ठेवलं तेंव्हा बारीक पाऊस पडत होता. दादांच्या घरापर्यंत ही मंडळी भिजत-भिजतच आली होती.  त्यामुळं   दादांशी चर्चा करत असताना हिटलरला दोन-तीन वेळा शिंका आल्या. त्यावेळी विनायक दादा हिटलरला म्हणाले,

"तुम्हाला शिंकाचा त्रास सारखा होत असेल तर मी एका आयुर्वेदिक काढ्याचा फॉर्म्युला देतो. अगदी प्राचीन  आहे"

त्यावर हिटलर नाक पुसत पुसत म्हणाला,  "तयार काढा नाही का तुमच्याकडे? आता लगेच घेतला तर बरे वाटेल थोडेसे"

"नाही, आयुर्वेदिक औषधाने लगेच बरे होत नसते",  दादा म्हणाले, "कारण आयुर्वेदिक औषधांचा परिणाम लगेच होत नाही. तुम्ही आता काढा घेतलात तर सहा महिन्यांनी तुमच्या शिंका बंद होतील, कायमच्या".

या भेटीत  दादांनी  प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये असलेलं मिसाइलचं तंत्रज्ञानही हिटलरला उलगडून  सांगितलं.  मिसाइल कशा प्रकारे काम करतं ते  दादांनी हवेत कागदी बाण सोडून दाखवलं. त्यानंतर  दादा सगळ्यांना घेवून अंगणात आले आणि त्यांच्या समक्ष  आकाशात एक बाण सोडला.  हिटलरकडं बघत दादा   म्हणाले, "हा बाण थोड्याच वेळात जर्मनीत तुमच्या मुख्यालयाच्या  आवारात पडेल".  ते ऐकून सगळ्यांनी आश्चर्याने आपापल्या तोंडात बोटे घातली. गम्मत म्हणजे गोबेल्सचं बोट चुकून त्याच्या नाकात गेलं होतं. हिटलरला असं कोणी नाकात बोटं घातलेलं आवडत नसे, त्यामुळं  त्यानं गोबेल्सकडं रागानं बघितलं. गोबेल्सनं घाबरून पटकन आपलं  बोट नाकातनं  बाहेर काढलं आणि आपल्या पंचाला पुसले.

या प्रात्यक्षिकाच्या वेळी दादांनी सांगितले, "मी इंग्लंडला शिक्षण घेत असताना पहिल्यांदा याचं प्रात्यक्षिक  केले होते. मी एक कागदी बाण अगदी अचूक ठिकाणी सोडला होता. अर्थात तो बाण संदेशवहनासाठी होता. पण आमच्या प्राध्यापकाने तो बाण जप्त केला. त्यामुळे एखादेवेळी ब्रिटीश लोकांनाही हे तंत्रज्ञान अवगत झाले असल्याची शक्यता आहे"

दादा एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी घरात जावून एक प्राचीन छत्री आणली आणि ते हिटलर आणि मंडळींपुढं अंगणातल्या झाडाच्या पारावर चढले. त्या छत्रीला बरीच भोकं पडली होती. दादांनी ती छत्री उघडली आणि पारावरून खाली उडी मारली. पण त्यांचा हा प्रयोग अयशस्वी झाला. ते धप्पदिशी उताणे पडले. पण पडले तरी त्यांचं नाक  वरच होतं. हिटलर आणि मंडळी मनातल्या मनात फिदी फिदी हसली. पण दादांनी न डगमगता  पुन्हा एकदा तो प्रयोग केला.  यावेळी मात्र तो यशस्वी झाला. ते तीन फूट उंच पारावरून तरंगत खाली आले.

'कमाल आहे...' हिटलर आश्चर्याने म्हणाला.
'हे तर कांहीच नाही', दादा म्हणाले, 'मागे एकदा अशी छत्री वापरून  मी विमानातून उडी मारली होती'
'कधी? कुठे? का? ' हिटलरने डोळे विस्फारून विचारलं.
'दक्षिण आफ्रिकेत. मी विमानात होतो आणि अचानक मला एक  पोलीस दिसला. त्याला घाबरून मी सरळ विमानाच्या दरवाजाकडे पळालो आणि छत्री उघडली. विमानातून खाली उडी मारली'
'भीती नाही वाटली तुम्हाला? आकाशातनं एवढ्या उंचावरून उडी घेताना?'
'छे छे, विमान त्यावेळी आकाशात नव्हते कांही,  विमानतळावरच  उभे होते ते'
हिटलर म्हणाला, ‘असे होय! बरे पण या छत्रीला एवढी भोके का पडलेली आहेत?’
दादा म्हणाले, ‘पडली नाहीत, मुद्दाम पाडली आहेत. त्याला एक शास्त्रीय कारण आहे. भोके नसतील तर हवेच्या दाबाने छत्री उपडी होईल. पण भोके असल्यामुळे छत्री उपडी होत नाही आणि आपण तरंगत खाली येतो. आमच्या प्राचीन ग्रंथात ही माहिती दिलेली आहे’

दादांनी दिलेल्या तंत्रज्ञानाचा हिटलरला मोठा उपयोग होणार होता. त्यामुळं खूष होवून त्यानं दादांना आपलं स्वत:चं पिस्तूल भेट दिलं. ते घेत दादा म्हणाले, ‘थांबा, मी हे एका पुस्तकात लपवून ठेवतो’
हिटलरला कांही कळेना, पुस्तकात पिस्तूल कसं लपवणार? तेवढ्यात दादांनी कपाटातून एक जाडजूड पुस्तक काढलं आणि ते उघडलं. त्या पुस्तकाच्या आतली पानं  कोरून त्यात  पिस्तूल बसेल अशी जागा तयार करण्यात आली होती. दादांनी ते पिस्तूल त्या पुस्तकात ठेवलं, मग ते पुस्तक कपाटात त्याच्या जागी परत ठेवून दिलं.

हिटलरला दादांच्या बुद्धिमत्तेचं पुन्हा एकदा कौतुक वाटलं, म्हणून त्यानं पुन्हा एकदा आपल्या तोंडात बोट घातलं. ते बघून त्याच्या साथीदारांनीही आपापल्या तोंडात बोट घातलं. यावेळी गोबेल्सनं  आपलं बोट नाकात जाणार नाही याची काळजी घेतली.

या जर्मन मंडळींना मराठी येत नसल्याने आणि  दादांना जर्मन भाषा येत नसल्यानं, तसेच इंग्रजी ही दोन्ही पार्टीसाठी शत्रूची भाषा असल्यानं  त्यांचं  संपूर्ण  संभाषण संस्कृत भाषेत झालं.

एवढ्या लांबून आलेल्या या जर्मन पाहुण्यांना दादांनी  जेवण तर राहोच पण साधं पाणीदेखील विचारलं नाही. कारण दादा आपली प्राचीन परंपरा आणि रीतीरिवाज यांचे कसोशीनं पालन करत असत.

हिटलरला अणुस्फोट आणि मिसाईल यांचं तंत्रज्ञान दिल्यावर  दादांना मोठं समाधान वाटलं, कारण ते योग्य त्या ठिकाणी, म्हणजे शत्रूच्या शत्रूकडं पोहोचलं होतं. या तंत्रज्ञानाचा उपयोग हिटलर ब्रिटीशांच्या विरुद्ध करणार आणि त्यामुळे ब्रिटीशांचा साम्राज्यसूर्य मावळणार याची दादांना पूर्ण खात्री झाली. आपण ब्रिटिशांना उल्लू बनवले याचाही त्यांना खूप आनंद झाला होता.

पुढे हिटलरने दादांनी दिलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर शस्त्रे बनवून ती इंग्लंडच्या विरोधात वापरली. त्यामुळे इंग्रज एकदम जेरीस आले. हिटलरला हे तंत्रज्ञान दादांनी दिले अशी गुप्त खबर इंग्रजांना लागली आणि दादांना पुन्हा अटक झाली. पण युद्धात इंग्लंडची हालत खराब झाल्यामुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला आणि दादांची पुन्हा सुटका झाली. त्यावेळी दादा म्हणाले, भारताला आम्हा क्रांतीकारकांच्यामुळे किंवा स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले नसून हिटलरमुळे मिळाले. मेला बिचारा, पण जाता जाता भारताला स्वातंत्र्य मिळवून देवून गेला!

(हे दादा क्रांतिकारक असले तरी इतर लोकल क्रांतिकारक त्यांना फारसं महत्व देत नसत. याचं कारण दादांची खानदानी श्रीमंती,  प्रचंड बुद्धिमत्ता, त्यांचं विमानातून परदेशी फिरणं, मोठमोठ्या जागतिक नेत्यांशी संबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची ब्रिटीश बायको हे असावं. या गोष्टी जेलसी निर्माण करणाऱ्या होत्या. त्यामुळं दादांचा उल्लेख हिटलरच्या डायरीत,  इंग्लंडच्या सरकारी रेकॉर्डसमध्ये आहे, दक्षिण आफ्रिकेत तर दादांनी ज्या विमानातून उडी मारली होती ते विमान अजूनही जपून ठेवले आहे. पण भारतातल्या लोकांना दादांविषयी फारशी माहिती नाही. पिकतं तिथं विकत नाही हेच खरं ).

(ही लेखवजा काल्पनिक कथा 'Indische Freiheitskämpfer und Deutschland by Adolf German' आणि Dadasaheb Rao and his activities against British Rule: By Colonel Winston Chiplon या दोन काल्पनिक पुस्तकांवर आधारीत आहे. या कथेतील पात्रे आणि घटना काल्पनिक असून त्यांचे  कोणत्याही मयत व्यक्तिशी अथवा ऐतिहासिक घटनेशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा).

हेही वाचा:

३ टिप्पण्या:

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा