Advt.

Advt.

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

शिवानी द ग्रेट

 -महावीर सांगलीकर



‘शिवानी, तुझा रिपोर्ट तयार आहे. आपण कधी भेटायचं?
‘उद्या...?’ तिनं विचारलं.
‘एक मिनिट...’ असं म्हणत त्याने कॅलेंडरकडं बघितलं. मग म्हणाला, ‘ओके, उद्या दुपारी भेटू’
‘मी उद्या सकाळी फोन करून किती वाजता भेटायचं ते कन्फर्म सांगते. त्याचं काय आहे, उद्या आख्ख्या भारताला सुट्टी असली तरी आमच्या ऑफिसचं काय खरं नाही. उद्या मला सुट्टी असली तर दुपारी भेटू, नाहीतर मग संध्याकाळी भेटू’
‘ओके’ असं म्हणून त्यानं फोन बंद केला. 

या गूढ आणि डेंजरस मुलीला भेटायला उद्याची तारीख आणि वार ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी त्यानं कॅलेंडरकडं बघितलं होतं.

त्याची आणि शिवानीची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यानं तिला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली आणि तिनं ती लगेच स्वीकारलीही. तो सहसा मुलींना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवत नसे. ती खूप सुंदर होती. पण तिला रिक्वेस्ट पाठवण्यामागं तिचं सुंदर असणं हे कारण नक्कीच नव्हतं. तो असल्या गोष्टींच्या पलीकडं गेला होता. त्याचा त्यालाच प्रश्न पडला, का बरं आपल्याला हिला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवावी असं वाटलं? आणि का ती आपल्याशी एवढ मनमोकळेपणानं चॅटिंग करते?

आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यानं तिचं फेसबुक प्रोफाईल चेक केलं. तिची जन्मतारीख 8 होती.
‘तरीच’ तो मनात म्हणाला. त्याच्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर त्याला मिळालं होतं. पण हे एवढंच कारण होतं का?

या मुलीनं तिच्या आयुष्यात बरंच कांही सहन केलेलं दिसतंय,  तिच्या जन्मतारखेवरनं त्याला अंदाज आला.

पुढे एकदा चॅटिंग करत असताना ती तिनं भोगलेलं दु:ख सांगू लागली. ते फारच भयानक होतं. कोणतीही मुलगी सांगायला धजावणार नाही असं. तो ओरडला, ‘स्टॉप..स्टॉप.. मला पुढ सांगू नकोस. मला ऐकवत नाही’

तिचे फोटो बघून त्यानं बरेच अंदाज केले होते.  तिच्या उजव्या गालावर एक सुंदर खळी होती. तिच्या कपाळावर डाव्या बाजूला एक मोठा तीळ होता. तिच्या नाकाच्या शेंड्यावर एक अस्पष्ट आणि बारीक तीळ होता. तिच्या गळ्याच्या उजव्या बाजूला कॉलर बोनच्या वरच्या बाजूस शेजारी-शेजारी असलेले दोन मोठे तीळ होते. एखादा नाग डसल्यावर जशी खूण उमटेल तसे दिसणारे.  त्यानं आजपर्यंत हजारो चेहरे वाचले होते, पण तिळांची अशी जोडगोळी तो पहिल्यांदाच बघत होता.  तिच्या सुंदर चेह-यामागे आणखी बरंच कांही होतं. चांगलं आणि वाईट.

तसा तो कोणाला भेटायला जायला फारसा उत्सुक नसे. पण या मुलीला आपण एकदा भेटायलाच पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला.

ती फेसबुकवर तिच्या वॉलवर सारखे नवीन-नवीन फोटो टाकत असे. स्वत:च स्वत:चे काढलेले. एकदा फेसबुकवर तो तिला म्हणाला, ‘शिवानी, फेसबुकवर किंवा इंटरनेटवर तुझे फोटो टाकत जाऊ नकोस. आधीच तू सुंदर आहेस. जरा जास्तच. अशा फोटोंचा दुरुपयोग  होऊ शकतो’

नंतर एकदा तो तिला म्हणाला, ‘फेसबुकवर कोणाशीही मैत्री करताना जरा जपून मैत्री करत जा. उगीच कोणालाही तुझे मित्र बनवू नकोस. अर्थात तुला हे सांगायची गरज नाही. तुझ्याकडं कॉमन सेन्स आणि सिक्स्थ सेन्स या दोन्ही गोष्टी आहेत’ 

एके दिवशी त्यानं तिला मेसेज पाठवला, ‘मला तुझा आवाज ऐकायचा आहे. आवाज दो... मला फोन कर, नाही तर तुझा फोन नंबर दे, मी तुला फोन करेन’

संध्याकाळी तिचा फोन आला. तिचा आवाज त्याच्या अपेक्षेप्रमाणेच हाय फ़्रिक्वेन्सीचा होता. गोड, सतत ऐकत रहावा असा. ती काय म्हणत होती यापेक्षा तिचा आवाज ऐकण्यातच तो दंग झाला होता.

तो पट्टीचा कथालेखक. त्याला तिच्यावरून एक भन्नाट कथा सुचली. एक गूढ, रोमांटिक आणि अॅक्शन पॅकड कथा. कथेची आउटलाईन तयार झाली आणि त्याच्या लक्षात आलं, ही कथा नव्हे तर कादंबरी होऊ शकते. पात्रे वाढत गेली. गूढ शक्ती असणा-या पाच मुलींच्या पराक्रमाची गोष्ट सांगणारी कादंबरी. अर्थातच शिवानी हे त्यातलं मुख्य पात्र रहाणार. त्या कादंबरीसाठी त्याला नाव सुचलं, ‘कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स’ कादंबरीच पहिलं प्रकरण त्यानं लिहूनही काढलं. त्यात त्यानं शिवानीला थोडक्यात इंट्रोड्यूस केलं......

‘गर्ल्स’, कर्नल चौधरी म्हणाले, ‘लेट मी इंट्रोड्यूस धिस यंग गाय.. कॅप्टन विजय प्रताप सिंग.  हा आपल्या सिक्रेट मिशनचा प्रमुख असणार आहे. ही इज फ्रॉम मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिस. खास आपल्या  मोहिमेसाठी मी त्याला तिथून इकडे ट्रान्स्फर करून घेतले आहे’

मग कर्नल चौधरी कॅप्टन विजयकडे बघत म्हणाले, ‘या पाचही मुलींच्याकडे विचित्र आणि गूढ अशा सुपरनॅचरल पॉवर्स आहेत. त्या पॉवर्सबद्दलची माहिती या मुली आता तुला सांगतीलच. तुला जे मिशन पूर्ण करायचे आहे त्यात या मुलींच्या या पॉवर्सचा कसा आणि कुठे उपयोग करून घ्यायचा आहे हे तू ठरवायचे आहे’.

मग ते त्या मुलींकडे बघत म्हणाले, ‘गर्ल्स, नाऊ इंट्रोड्यूस युवरसेल्फ... नाव, गाव आणि तुम्हाला येतंय ते सगळं कांही...’

कर्नल चौधरींच्या शेजारी बसलेली मुलगी उभी राहिली.

‘आय एम शिवानी... शिवानी सावंत. कोल्हापूर, महाराष्ट्र. गेली दोन वर्षे रॉमध्ये काम करत आहे. मी वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीचा आवाज काढू शकते. अगदी माणसाला ऐकू येणा-या फ्रीक्वेन्सीच्या बाहेरील फ्रीक्वेन्सीचा आवाज देखील. जे आवाज इतरांना ऐकू येत नाहीत ते मला ऐकू येतात. पलीकडच्या खोलीत बसलेले लोक काय बोलत आहेत हे मी इथे बसूनच स्पष्ट ऐकू शकते. रस्त्याच्या पलीकडे उभी असलेली दोन माणसे एकमेकांशी काय बोलत आहेत हे देखील मला स्पष्ट ऐकू येते. मी एकाच वेळी अनेक संभाषणे ऐकू शकते. माझ्या जिभेच्या शेंड्यावर काळा डाग आहे. मी जर वाईट कांही बोलले तर ते खरे होते. शिवाय वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि पक्षांच्या भाषा मला कळतात. त्यांनी काढलेले जे आवाज इतरांना ऐकू येत नाहीत ते मला ऐकू येतात. त्याच प्रकारचे आवाज मीही काढू शकते. आपल्या मोहिमेत या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग होऊ शकतो हे सांगायची गरज नाही. मला सगळ्या प्रकारची शस्त्रे चालवता येतात, पण शस्त्रांचा उपयोग करण्याची वेळ माझ्यावर सहसा येत नाही’.

हे ऐकून कॅप्टन विजयने आश्चर्याने डोळे विस्फारले.

‘शिवानीची ही ताकत मी अनुभवली आहे,’ कर्नल चौधरी कॅप्टन विजयला म्हणाले, ‘इन फॅक्ट तिच्या या ताकतीचा आम्ही गेली दोन वर्षे छोट्या प्रमाणावर उपयोग करून घेत आहोत’. मग शिवानीकडे बघत ते म्हणाले ‘शिवानी, टेक युवर सीट’


मग त्यानं शिवानीला भेटायचं ठरलं. रविवारी. पण त्याला ते जमलं नाही. त्यानं ‘सॉरी’ असा निरोप पाठवला, आणि पुढच्या रविवारी भेटूया अस म्हणाला. त्या दरम्यान एक विचित्र घटना घडली.

शिवानी तिच्या मोपेडवरनं चौकातला ट्राफिक सिग्नल तोडून पुढे गेली आणि तिचा अपघात झाला. तिच्या पायाला मोठी जखम झाली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मग ती गावी निघून गेली. जाण्यापूर्वी तिनं त्याला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. त्याला वाईट वाटलं आणि तिचा रागही आला. सिग्नल तोडायची काय गरज होती? पण दोष तिचा नव्हता. शी वाज व्हिक्टिम ऑफ हर नंबर्स. 

ती गावी बरेच दिवस राहिली. पाय बरा होईपर्यंत. ती कधी एकदाची बरी होते, कधी एकदा सिटीत येतेय आणि कधी एकदाची आपल्याला भेटतेय अस त्याला झालं होत. एकदा तर त्याला वाटलं, तिच्या गावी जावं आणि तिला भेटावं. पण दुस-याच क्षणी त्यानं हा विचार मनातनं काढून टाकला. त्या ऐवजी दुसरं कांही करता येईल का?

त्यानं तिला मेसेज पाठवला, ‘तुझ्या पायाला झालेल्या जखमेचे फोटो पाठव. तुला किती लागलंय ते मला बघायचं आहे’

तिनं लगेच तिच्या पायाचे सेल्फी फोटो त्याला पाठवून दिले. बरीच मोठी जखम दिसत होती. त्यानं त्यातला एक फोटो डाऊनलोड केला आणि फूल स्क्रीन मोडवर ओपन केला. आपले डोळे झाकून घेतले. फोटोतल्या जखमेवरनं आपल्या उजव्या हाताची चार बोटे स्पर्श न करता फिरवली. मनात म्हणाला, ‘शिवानी, लवकर बरी हो आणि लवकर चालायला लाग’.

नंतर तो तिला एन्करेज करत राहिला. कधी फोन करून तर कधी फेसबुकवर मेसेज पाठवून. ‘शिवानी, तू गावापासनं सिटीपर्यंत चालत-चालत नाही तर पळत-पळत यायला पाहिजेस’... ‘तुझ्या पायात एवढी ताकत यायला पाहिजे की लाथ मारता यायला पाहिजे’.

कांही दिवसांनी ती हळू हळू चालायला लागली.

एके दिवशी त्याला तिचा फोन आला, ‘मी सिटीत आलेय. कामावर पण रुजू झालेय’
‘छान. मग कधी भेटायचं?’
‘तुम्ही सांगा..’
‘रविवारी?’
‘चालेल’

पण रविवारी तो कांही तिला भेटू शकला नाही. मग पुढच्या रविवारी भेटायचं ठरलं. पण त्याला अचानक गावी जावं लागलं. तो तिला ते कळवूही शकला नाही. सोमवारी तो परत आला, तर फेसबुकवर तिचा मेसेज होता, ‘सॉरी, काल मी भेटू शकले नाही’

तो म्हणू शकला असता, ‘काल मी तुझी वाट बघत होतो खूप वेळ. तुला फोनही ट्राय केला अनेकदा, पण लागत नव्हता’ पण त्याने पहिल्यापासूनच ठरवले होते, ‘आपण या मुलीशी कधीही खोटं बोलायचं नाही’
त्यानं तिच्या मेसेजला उत्तर दिले, ‘सॉरी म्हणण्याची गरज नाही शिवानी. काल मी इथं नव्हतो. मला अचानक गावी जावं लागलं. तुला कळवू शकलो नाही. त्यामुळं मीच सॉरी आहे’

नंतर बराच काळ त्यांच्यात फारसा कांही संवाद झाला नाही. पण एके दिवशी महत्वाचं काम करत असताना त्याला अचानक वाटलं की तिला फोन करावा. तिची अशी अचानक आठवण का आली हे त्याला त्यावेळी कळलं नाही. त्याने फोन करून तिच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या. विचारपूस केली.

परत दोघातला संवाद कमी झाला.

कांही दिवसांनी त्यानं मनावरच घेतलं. तिला लवकरात लवकर भेटायचंच.
आधी त्याने करुया करुया म्हणत अनेक महिने रखडलेला तिचा न्यूमरॉलॉजी रिपोर्ट पूर्ण केला.

बर्थ नंबर 8
लाईफ पाथ नंबर 9
नेम नंबर 5
युनिक कॉम्बिनेशन ऑफ अ सफरर, अ कॉंन्करर, वॉरिअर अॅण्ड अ मल्टी टॅलेंटेड पर्सन. अ ग्रेट लॉंन्ग टर्म अॅचिव्हर. डॉमिनंट अॅण्ड डिमांडिंग. वाकड्यात शिरणा-याला अद्दल घडवणारी. अ रिव्हेंज टेकर. एक आक्रमक आणि रागीट मुलगी. तेवढीच प्रेमळ आणि हळवी. अ मिक्सड पर्सनॅलिटी.

8+9+5=22
अरे बाप रे...... हा नंबर इथेही आलाच का? आता त्याला कळलं, ही आपुलकी 22 नंबर मुळं तयार झाली आहे.

मग त्यानं तिला फोन केला,
‘शिवानी, तुझा रिपोर्ट तयार आहे. आपण कधी भेटायचं?

+++

सिटीत गेल्यावर त्यानं तिला फोन केला. संध्याकाळी बरोबर सहा वाजता. आपण आलो असल्याचं तिला सांगितले. ती म्हणाली, ‘मी बरोबर साडे सहा वाजता गुडलक चौकात येते. आपण तिथं भेटू’
‘साडेसहा वाजता नको.. मी तिथं बरोबर पावणे सात वाजता येतो’ 
‘चालेल. तो पर्यंत मी माझं आवरते’
‘मेक अप वगैरे कांही करू नकोस. तू जशी आहेस तशीच मला बघायचं आहे’
बरोबर पावणे सात वाजता त्याला तिचा फोन आला. त्यावेळी तो गुडलक चौकापासून थोडा दूर होता. ‘आलोच दोन मिनटात’ तो म्हणाला.

तो त्या चौकात पोहोचला तेंव्हा एका मोपेडवर एक मुलगी बसली होती. त्यानं पाठीमागनंच ओळखलं की ती शिवानी आहे. तो हळूहळू तिच्या दिशेने चालू लागला. एवढ्यात तिनं आपला मोबाईल फोन हातात घेतला. ही आता आपल्याला फोन लावणार, त्यानं ओळखलं. त्यानं आपला मोबाईल फोन आपल्या हातात घेतला. त्याचा मोबाईल फोन वाजू लागला. तोपर्यंत तो तिच्या जवळ पोहोचला होता. फोन रिसीव्ह न करता त्यानं तो तिच्या कानाजवळ नेला. तिनं अचानक मागं वळून बघितलं आणि गोड हसली. म्हणाली, ‘बसा, आपण दुसरीकडे जाऊ’.

तो तिच्या मोपेडवर मागे बसला. चौकात रेड सिग्नल लागला होता आणि तिला घाई होती. चौकातल्या ट्राफिक हवालदार बाईनं तिला खुणेनंच ‘जा’ असं सांगितलं. तिची गाडी सुसाट वेगानं धावू लागली.

या सगळ्या गडबडीत तो तिच्या गाडीचा नंबर बघायचं विसरला. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला भेटायच्या वेळी आधी त्याचं लक्ष गाडीच्या नंबरकडं, रंगाकडं जात असे. यावेळी पहिल्यांदाच तसं घडलं नाही.
मोकळे सोडलेले केस. किंचित कुरळे. वा-याने उडून ते त्याच्या तोंडावर येऊ लागले. तो पटकन मागे सरकला. मध्ये अंतर ठेऊन बसला.

गप्पा-टप्पा मारत ते एका महागड्या कॉफी हाउस जवळ आले. तिनं पार्किंगमध्ये गाडी लावली. मग ते दोघे त्या कॉफी हाउसमध्ये शिरले. एका टेबलावर समोरासमोर बसले. बाजूला तरुण मुलामुलींचा एक घोळका बसला होता. जोरजोरात गप्पा मारत होता. शिवाय तिथं एका स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे लागले होते. त्या हॉटेलला न शोभणारे वातावरण. त्याला आरडाओरडा, मोठा आवाज अजिबात आवडत नसे. तो म्हणाला, ‘शिवानी, इथं नको. इथं आपल्याला नीट बोलता येणार नाही. आपण बाहेरच्या बाजूला बसू’

दोघंही तिथनं उठले आणि बाहेरच्या बाजूस आले. एका टेबलावर समोरासमोर बसले. तिनं कॉफीची ऑर्डर दिली.

‘तुला तुझा रिपोर्ट देतो’ असे म्हणत त्यानं त्याची हॅंडबॅग हातात घेतली.
ती म्हणाली, ‘नको... मी वाचेन सावकाश. आत्ता आपण गप्पा मारू’
त्यानं बॅग ठेवून दिली.

तिच्या चेह-याकडं बघत असताना त्याच्यातला फेसरीडर जागा झाला. त्यानं तिचे फोटो बघितलेच होते, पण इथं प्रत्यक्षात आणखी बरंच कांही दिसत होत. त्याच्या सराईत नजरेनं तिच्या चेह-यावरच्या अनेक गोष्टींची नोंद घेतली. त्यांचा अर्थ तिला लगेच उलगडून सांगायची गरज नव्हती. ही कथा ती वाचेलच, त्यातनं तिला कळेल, तो मनात म्हणाला.

‘तुम्हाला माझी जीभ बघायची होती ना?’ असं विचारत तिनं आपली जीभ बाहेर काढली. स्वच्छ, लाल गुलाबी. तिनं त्या जिभेची अशी कांही हालचाल केली की एखाद्या नागिणीने आपली जीभ बाहेर काढून वळवळावी.

तिच्या जिभेच्या शेंड्यावर काळे ठिपके होते. जणू काळ्या ता-यांचा समूह.

एकाच व्यक्तिमध्ये इतक्या ऑकल्ट साइन्स? हे जगातलं रेअरेस्ट उदाहरण दिसतंय, त्याच्या मनात विचार आला.


पुढे चालू .....
शिवानी द ग्रेट: भाग 2
या कथाही वाचा:
सलोनी राठोड 
गौरी आणि फेस रीडर 
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा