Advt.

Advt.

रविवार, १८ जानेवारी, २०१५

गर्ल्स होस्टेल

-महावीर सांगलीकर 


पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. तिथं गेलो की आपण पुण्यातच आहोत का याची शंका येते. अशाच एका भागात मुलींचं एक होस्टेल आहे. तिथं 20 मुलींच्या राहण्याची सोय आहे. त्यातील कांही मुली विद्यार्थिनी आहेत तर कांही जॉब करतात. भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मुली तिथं रहातात. त्यामुळे तिथलं वातावरण एकदम कॉस्मोपॉलिटन.

हे होस्टेल एका ट्रस्ट मार्फत चालवलं जातय.

या होस्टेलची रेक्टर माझी लांबची मावशी. तिची माझी बरेच दिवस गाठभेट नव्हती. मला मागे तिचा दोन-तीनदा फोन आला होता, भेटून जा म्हणून. पण मी कांही तिला भेटायला गेलो नव्हतो. पण परवा तिचा परत एकदा फोन आला, ‘तुला किती वेळा बोलवायचं रे? इन्व्हिटेशन कार्ड पाठवू का? की कार पाठवू तुला आणयला? आता जर तू आला नाहीस तर मी तुला कधीच बोलावणार नाही इकडं. मी हे होस्टेल सोडून चाललेय. बस्स झाली ही कटकट’. हे सगळं ती एका दमात बोलून गेली.
मला वाईट वाटलं. मी विचारलं, ‘का, काय झालं गं मावशी?’
‘तू ये इकडं दोन दिवसाच्या आत. मग तुला सांगते काय झालय ते. नाही आलास तर तुझं स्वप्न अपुरं राहील बघ’
‘माझं स्वप्न? कोणतं?’
‘तेच... गर्ल्स होस्टेल बघायचं स्वप्न. तुला कादंबरी लिहायची होती ना लेडीज होस्टेल या थीमवर?’
‘हां, मी येतोच उद्या... तू अजून किती दिवस आहेस तिथं?’
‘तीन दिवस फक्त’ असे म्हणत तिनं फोन कट केला.

कांहीतरी गंभीर मामला आहे हे माझ्या ध्यानात आलं. दुस-या दिवशी मी माझी सगळी कामं,  अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून होस्टेलवर गेलो. गेट बंद होतं. मला बघून वॉचमन गेटजवळ आला.
‘काय पाहिजे?’ असं त्यानं माझ्याकडं संशयानं बघत विचारलं.
मी म्हणालो, ‘पाटील बाईंना भेटायचं आहे’
‘त्या आज भेटत नाहीत कुणाला. आज सुट्टी आहे.. उद्या या’
‘त्यांना सांगा त्यांचा भाचा आला आहे भेटायला’
त्यानं मला एकदा न्याहाळलं आणि तो लगबगीने आत गेला. लगेच परत आला आणि गेट उघडलं.

‘आलास? मला वाटलं येणार नाहीस’ मावशी मला समोरच्या खुर्चीवर बसायची खूण करत म्हणाली.
‘मावशी, तू होस्टेल का सोडायला लागलीस? एवढी का वैतागली आहेस?’ मी विचारलं.
‘अरे, इथल्या पोरींनी वैताग आणलाय नुसता. एकही कार्टी नीट वागत नाही. माझ्या आधीच्या दोन रेक्टर पळून गेल्या वैतागून. आता मी पण चाललेय’
‘नेमका काय प्रॉब्लेम आहे त्या मुलींचा? नीट वागत नाहीत म्हणजे नेमकं काय?’
‘ते कळायला तुला या होस्टेलमध्ये येऊन रहायला लागेल’
‘मी? मला कसं काय राहू देतील इथं?’
‘रेक्टर म्हणून येणार का? मॅनेजमेंटवाले स्त्री रेक्टर ऐवजी पुरुष रेक्टर ठेवणार आहेत आता. ते पण वैतागलेत या मुलींच्या प्रॉब्लेम्सना. लेडीज रेक्टर्स पळून जातात म्हणून देखील. तू रेक्टर म्हणून येणार असशील तर मी तुझी शिफारस करेन’
‘पण मला कशाला सिलेक्ट करतील ते रेक्टर म्हणून?’
‘तू ट्राय कर. तू सिलेक्ट झालास तर तुझा मोठा फायदा आहे. तुझ्या कादंबरीसाठी भरपूर मालमसाला मिळेल तुला इथं. एकेक नमुने बघायला मिळतील. कादंबरी लिहायला निवांत वेळ मिळेल तुला तुझ्या क्वार्टरमध्ये रात्री. शिवाय तू या पोरींना वठणीवरदेखील आणू शकशील’
‘सॉरी.... आय एम नॉट इंटरेस्टेड. कुठं या पोरींच्या नादी लागायचं... एखादी जिनिअस मुलगी भेटली तर माझा सगळा वेळ तिच्या भल्याचा विचार करण्यात जातो. माझ्या अंदाजे इथल्या सगळ्याच मुली जिनिअस दिसतात. एखाद दुस-या मुलीचा बाप होणं ही वेगळी गोष्ट आहे. पण वीस मुलींचा बाप? इट विल बी हॉरिबल. डोक्याचं भजं होईल माझ्या. तसंही मी इंडिव्हिज्युअली एकावेळी एकाच मुलीला सुधरवतो, माझी कामं सांभाळून आणि माझ्या कामाचा भाग म्हणून... पण असं इथं राहून सगळ्यांना सुधरवण्यात मी इंटरेस्टेड नाही... आणि मला वेळ तरी कुठं आहे  इथं येऊन राहायला?’
‘अरे, चॅलेंजिंग काम आहे. चॅलेंजिंग आहे म्हणून तर करायचं असतं. तुला पगार जास्त मिळणार नाही इथं, पण तू जो अनुभव घेशील तो तुला 20 कादंब-यांचं मटेरीअल देईल. एकेकीचं आयुष्य म्हणजे एकेक कादंबरीच आहे’
‘पण माझ्या कामाचं काय? एवढ्या कष्टानं व्यवसाय उभा केलाय, बंद पडेल की तो’
‘मग तू एक काम कर... रेक्टर म्हणून फुलटाईम येऊ नकोस तू. त्यापेक्षा कौन्सलर म्हणून ये. आठवड्यातनं एक-दोनदा. तेही तास-दोन तास. रेक्टर मिळेल दुसरा कोणीतरी होस्टेलला’
‘कौन्सलर?’
‘तू मोटीव्हेटर आहेस ना? तुझं बरंच नाव झालय जिकडं तिकडं. मॅनेजमेंटला रेक्टर बरोबरच एक कौन्सलर पण पाहिजे जो या मुलींचे प्रश्न समजवून घेऊ शकेल, ते सोडवू शकेल आणि त्यांना मोटीव्हेट करू शकेल. तू हे चांगल्या रीतीने करू शकतोस’
‘इंटरेस्टिंग... हे मी करू शकतो...नक्कीच’
‘मग येत्या बुधवारचे पेपर वाच. जाहिरात असेल होस्टेलची. अर्ज कर’
‘मी? नोकरीसाठी अर्ज? मी माझ्या क्लाएंट्सना नोकरी करायची नाही, स्वत:चा बिझनेस करायचा म्हणून सांगत असतो आणि इथं मी नोकरीसाठी अर्ज करू? सॉरी’
‘आत्ताच तर इंटरेस्ट दाखवला होतास... लगेच माघार का?’
‘माघार नाही... पण मी अर्ज-बिर्ज कांही करणार नाही. नोकरी पण करणार नाही. पण मी इथं येणार आहे. माझा भरपूर वेळ देणार आहे’
‘तसं इथं तुला कोण येऊन देईल? इथं संबंध नसलेल्या लोकांना अजिबात प्रवेश नाही. इकडं फिरकू पण देत नाहीत कोणाला. मॅनेजमेंटची भूमिका याबाबतीत फार कडक आहे. नो चान्स’
‘काळजी करू नकोस मावशी. मला पाहिजे ते मी पद्धतशीरपणे घडवून आणतो. म्हणजे अगदी रॉवाले वगैरे करतात तेवढ्या सफाईने’
‘बघ बाबा... जे करायचं ते जपून कर’
‘हो... डोंट वरी... '
एवढ्यात मला चहाचा वास आला. मी म्हणालो, 'मावशी, कुणीतरी चहा केलेला दिसतोय वरच्या मजल्यावर. काय मस्त वास आहे...’
‘तुला प्यायचाय का चहा?’ मावशीनं विचारलं.
‘म्हणजे काय? चहाला मी कधी नको म्हणत असतो का?’
‘चल’ असं म्हणत आपल्या जागेवरनं उठली आणि ऑफिसच्या बाहेर पडली. मीही तिच्या मागोमाग निघालो. आम्ही जिना चढून दुस-या मजल्यावर आलो. रूम नंबर चारमधनं चहाचा वास येत होता. रूमचा दरवाजा उघडाच होता.
‘मने, येऊ का?’ असे विचारत मावशीने दारावर टकटक केली.
‘या मॅडम... तुमचीच वाट बघत होते’ असं म्हणत आतून एक मुलगी बाहेर आली.
‘हे कोण?’ माझ्याकडं बघत तिनं मावशीला विचारलं.
‘हा माझा भाचा. तुझ्या हातचा चहा प्यायला आणलं आहे त्याला’
‘ओह... माय प्लेजर. मॅडमसाठी एक कप चहा तयारच आहे. तुमच्यासाठी आणखी एक कप चहा तयार करते. जस्ट फाईव मिनट्स’ ती उत्साहाने म्हणाली.
तिने आम्हा दोघांना आत बोलावले आणि तिथल्या दोन खुर्च्या पुढे केल्या.

त्या मुलीनं मावशीला चहा दिला आणि माझ्यासाठी चहा करू लागली. मी त्या खोलीचं निरीक्षण करू लागलो. नीट नेटकी ठेवलेली रूम. भिंतीवर दोन चित्रे लटकवलेली. चित्राखाली मनिषा अशी सुबक सही. टेबलावर एक पुस्तक होतं ते मी हाती घेतलं.  टायटल होतं: आर्ट ऑफ इंडिया.

त्या रूममध्ये आणखीन एक कॉट होती. त्या भिंतीवर दोन पोस्टर्स लावली होती. एका पोस्टरवर एका अगडबंब, काळ्या  अमेरिकन बॉडी बिल्डरचा फोटो होता, तर दुस-या पोस्टरमध्ये मांजराची दोन काळी पिल्ले बागडत असलेला फोटो होता.

मनिषाला भारीच रूममेट मिळालेली दिसतेय.

ही मनिषा जरा स्थूल, बुटकी, फारशी सुंदर नसलेली पण आकर्षक मुलगी होती. मनमोकळेपणानं बोलणारी आणि उत्साही. रंग उजळ. वय 20 असावे. अंगावर ऑफ व्हाईट रंगाचा हिरवी नक्षी असणारा पंजाबी ड्रेस. मध्येच विचारात गढून जायची. तिच्या चेह-यावरचा मूड बदलायचा. 

एवढ्या निरीक्षणावरून मी समजून गेलो, हिचा बर्थ नंबर 2 आहे, आणि आपल्यासाठी बर्थ नंबर 2 वाले जरा जास्तच कोऑपरेटिव्ह असतात नेहमी. या होस्टेलमधलं मिशन यशस्वी करायला ही पोरगी आपल्याला उपयोगी पडू शकते. हिच्याशी मैत्री करायला पाहिजे.
डन. लगेच. त्यात काय अवघड असतंय एवढं?

‘मनिषा, गाव कुठलं तुझं?’ मी विचारून टाकलं.
‘तुम्हाला माझं नाव कसं माहीत?’
‘सोपं असतं नाव माहीत करून घेणं. सांगेन तुला नंतर ते..  आधी मला सांग, तुझं गाव कुठलं’
‘मी पुण्याचीच आहे’
‘पुण्याचीच? मग होस्टेलमध्ये का रहातेस?’
‘घरी अभ्यास होत नाही नीट, म्हणून मी होस्टेलमध्ये आले राहायला’ हे म्हणताना तिचा चेहरा जरा उदास झाला होता.
‘आय सी...’ मी म्हणालो.
बॅड फादरची गुड मुलगी दिसतेय ही..

इतक्यात मावशीला फोन आला. फोनवर ती म्हणाली, ‘आले दोन मिनिटात खाली’ मग आम्हाला म्हणाली, ‘तुम्ही बसा बोलत, मी जाते माझ्या कामाला’

तेवढ्यात चहा झाला. मनिषाने तो गाळून मला एका मगमध्ये दिला.

‘तू पुण्याची आहेस हे पटत नाही. चहा द्यायला खळखळ केली नाहीस आणि मोठ्या आनंदानं, मनापासनं चहा करून दिलास, तोही मग भरून, म्हणून म्हणतो...’
‘नाईस जोक...’ ती खळखळत हसत म्हणाली, ‘माझी आई सांगलीची आहे. त्यामुळे पाहुणचार वगैरे शिकलेय मी तिच्याकडूनं’
‘सांगली? सांगलीत कुठं?’
‘विश्रामबाग’
‘विश्रामबागमध्ये कुठं?’
‘वारणाली...... पण तुम्ही इतकं डिटेलमध्ये का विचारताय?’
‘कारण माय सरनेम इज सांगलीकर...’
हे ऐकून तिच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहू लागला. ती म्हणाली, ‘ते न्यूमरॉलॉजिस्ट सांगलीकर कोण तुमचे?’
‘मीच तो’
हे ऐकून ती आणखीनच खूष झाली. म्हणाली, ‘अहो मी आणि माझी रूममेट पुढच्या आठवड्यात तुमच्याकडे येणार आहोत’
‘खरंच?’ असे मी म्हणताच तिनं टेबलावरची डायरी हातात घेतली आणि तिची कांही पानं उलटली. मग मला एक पान दाखवत ती म्हणाली, ‘बघा काय लिहिलंय इथ..’
त्या पानावर नोंद होती,
दिनांक 8 ऑक्टोबर
सांगलीकर सरांची भेट घेणे, दुपारी 2 वाजता.
मी म्हणालो, ‘अशी तुझ्या डायरीत नोंद करून त्या दिवशी तुला मला भेटता येणार नाही पोरी. अपॉइंटमेंट घेतलेलीली नाही आहेस तू. उगीच तुझा हेलपाटा झाला असता’
ती थोडी नाराज होत म्हणाली, ‘चुकलं सर. आता अपॉइंटमेंट घेऊन भेटेन’
‘इट्स ओके. तुझा हेलपाटा वाचावा म्हणून मीच आलो बघ इकडं. सांग, काय प्रॉब्लेम आहे तुझा?’
‘सर, आपण नंतर बोलू माझ्या प्रॉब्लेमवर. मी येईन तुमच्याकडे नंतर. अपॉइंटमेंटमेंट घेऊन’
‘चालेल. पण मला तुझ्या प्रॉब्लेम्सची थोडीफार कल्पना आलीय’
‘?????’ ती कपाळाला आठ्या पाडत माझ्याकडे बघू लागली.
‘हे बघ, तुझ्या घरचं वातावरण ठीक नाही. तुझे वडील भांडतात सारखे घरातल्या सगळ्यांशी. तुला आर्टसची आवड, तर तुझ्या वडिलांना तू डॉक्टर किंवा आय टी इंजिनियर व्हावीस अशी इच्छा असणार बहुतेक. किंवा तुझं लग्न लवकर व्हावं म्हणून खटपट करत असणार ते. तू घरातनं वैतागून निघून आलेली मुलगी आहेस...... ’
हे ऐकताना तिचा चेहरा उदास झाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ‘तुम्हाला  मॅडमनी सांगितलं ना हे सगळं?’
‘अजिबात नाही’ मी म्हणालो.
‘मग हे तुम्हाला कसं कळलं? कोणी सांगितलं?’ तिनं मला विचारलं.
‘हे मला कुणीच सांगितलं नाही. हे मला कसं कळलं ते मलाही नीट माहीत नाही. तुझ्या चेह-यावरनं,  बोलण्यावरनं, बॉडी लँग्वेजवरनं आणि एकंदरीत ऑबझर्वेशनवरनं माझ्या मनात आपोआप निष्कर्ष निघाले’
‘तुम्ही म्हणताय त्यातलं बरचसं खरं आहे. मला आर्टसमध्ये बरंच कांही करायचं आहे हो. पण घरी राहून हे शक्य नव्हतं, म्हणून आले निघून इथ. पण अजूनही मला पाहिजे तसं यश मिळत नाही’
‘तू चंचल आहेस. डिप्रेसड आहेस. त्यामुळं तुला पाहिजे ते घडत नाही’
‘मग मी काय करायला हवं?’ 
‘गेट मोटीव्हेटेड’
‘कसं?’
‘दुस-यांना मोटीव्हेट कर, तू स्वत: मोटीव्हेट होशील’
‘आय सी’
‘मीही तुला मोटीव्हेट करू शकतो. पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. एक मिशन आहे, त्यात तू मला मदत करशील का?’
‘कसलं मिशन?’
‘काय आहे ते मी नंतर सांगेन. पण चॅलेन्जिंग आहे. त्यात तू भाग घेतलास तर तू खूप मोटीव्हेट होशील आणि तुझं जीवन बदलून जाईल’
ती विचार करू लागली.
‘तुझी जन्मतारीख किती? 11 किंवा 29 आहे ना?’
’11. पण हे तुम्हाला कसं माहीत?’
‘अंदाज करता येतो एखाद्या व्यक्तिचं वागणं आणि बोलणं यावरून’
‘कमाल आहे’
‘तू त्या मिशनमध्ये भाग घेणार आहेस. तुझी जन्मतारीख मला सपोर्टिंग आहे’
‘मी काय करायचं आहे?’ तिनं विचारलं.
‘सध्या ते सिक्रेट आहे. मिशन सुरू व्हायला वेळ आहे. योग्य वेळी मी तुला सांगेन तू काय करायचं आहेस ते’
‘पण मग माझा अभ्यास, माझा जॉब...?’
‘ते सांभाळूनच मिशनमध्ये भाग घ्यायचा आहेस तू. तुझा वेळ वाया जाणार नाही, मिशनचा तुझ्या अभ्यासावर आणि जॉबवर परिणाम होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. उलट मिशनमध्ये भाग घेतल्याने त्याचा तुला अभ्यासात फायदा होईल’
‘मग ठीक आहे’
‘पण मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे’
‘काय?’
‘हे मिशन या होस्टेलमध्येच होणार आहे. तू यातलं कुणाला कांही सांगायचं नाही. हे मिशन नंतर उघडकीस येईलच, पण त्यात तुझा सहभाग होता हे शेवटपर्यंत कळू द्यायचं नाही कोणाला’
‘ओके’
‘चल मग, मी निघतो आता. टेक केअर, बाय’ असे म्हणून मी तिचा निरोप घेतला आणि बाहेर आलो.

बाहेर व्हरांड्यात एक मुलगी आपल्या मोबाईलवर स्वत:चाच फोटो काढत होती. सेल्फी. वय 25 च्या पुढे असावं. जिनिअस दिसत होती एकंदरीत. फोटो काढत असताना ती गोड हसत होती. पण फोटो काढून झाल्यावर तिचा चेहरा गंभीर होई. फोटोजेनिक चेहरा. ती सुंदर होती पण तिच्या चेह-यावर प्रचंड राग दिसत होता. तो तिच्या टोकदार नाकावर  जरा जास्तच दिसत होत. अॅन्ग्री यंग गर्ल. अंगावर काळा शर्ट आणि जीन्सची काळी पॅंट. डोळ्यात काजळ घातलेलं, त्यामुळे तिचे टपोरे डोळे आणखीनच सुंदर दिसत होते.

हिला काळ्या रंगाची भलतीच आवड दिसतेय. पण हिचं मन काळं नाही हे आपल्याला जाणवतंय. पण ते डिस्टर्बड आहे. नक्कीच.

तिला माझी चाहूल लागली आणि तिनं माझ्याकडं वैतागलेल्या आणि संशयी नजरेनं बघितलं. एक्स्ट्रीमली कॉशस गर्ल.
ही मनिषाची रूममेट दिसतेय.
मी तिला हसून ‘हाय..’ म्हणालो. माझ्याकडं रागानं बघत कांही उत्तर न देता ती मला ओलांडून निघून गेली. रूम नंबर चारमध्ये शिरली आणि तिने धाडकन दार बंद केले. माणसांची अॅलर्जी दिसतेय हिला जबरदस्त.
मी तिच्या चालण्यावरनं आणि बॉडी लँग्वेजवरनं ओळखलं की जिमगर्ल आहे. तरीच त्या खोलीत बॉडी बिल्डरचे पोस्टर आहे.

मनिषाच्या रूममेटची आपण मनात जी कल्पना केली होती अगदी तशीच आहे ही बया. मनिषाच्या नेमका उलटा स्वभाव दिसतोय हिचा. प्रॉब्लेमॅटिक आणि चॅलेंजिंग केस. हिच्या जन्मतारखेत 8 आणि 9 हे दोन्ही नंबर असणार. नक्कीच.  बघू नंतर हिच्याकडं. आता आपण आपल्या मिशनच्या प्लॅनिंगकडं लक्ष द्यायला पाहिजे. आपला माणूसच इथं  रेक्टर म्हणून यायला पाहिजे.

बुधवारी जाहिरात येणार आहे असे मावशी म्हणत होती. मी लगेच माझ्या एका मित्राला टेक्स्ट मेसेज पाठवला,
‘There is a great and challenging opportunity for you.  Meet me within one hour’  

माझा हा मित्र रेक्टर म्हणून सहजच सिलेक्ट होण्यासारखा होता. यंग, धाडसी, डायनॅमिक, करारी आणि स्ट्रिक्ट. सतत जिंकणारा. कसलेही व्यसन नाही. जन्मतारीख 1 जानेवारी 1982. बर्थ नंबर 1, लाईफ पाथ नंबर 22. त्याच्या या दोन्ही नंबर्सचे गुण त्याच्यातून ओसंडून वाहात होते. त्याच्या कठोर वागण्यामागं एक प्रेमळ माणूस दडलेला होता. तो ही ऑपोर्च्युनीटी सोडणार नाही हे मला  जाणवत होते.

पण समजा त्यानं एखादेवेळेस नाही म्हंटलं, तर? कांहीही करून त्याला तयार करायचंच. एखादी गोष्ट गळी कशी उतरवायची हे आपल्याला चांगलेच जमते.

पण समजा तो सिलेक्ट नाही झाला तर? ही शक्यता तशी कमीच होती. पण समजा तसं झालंच तर आपला 'प्लॅन बी' आत्ताच तयार पाहिजे. फूल प्रूफ.

मी मावशीचा निरोप घ्यायला तिच्या ऑफिसमध्ये शिरलो, तेंव्हा एक पोस्टमन तिथनं बाहेर पडला. मी मावशीचा निरोप घेतला आणि बाहेर आलो.  गेटजवळ पोहोचलो तेवढ्यात वरच्या मजल्यावरनं मला गोड आणि शार्प आवाजात हाक आली.. ‘मिस्टर सांगलीकर..’

मी क्षणात ओळखले की ही त्या मनिषाच्या रूममेटची हाक आहे...मघाशी आपल्याकडं रागानं बघणा-या. मी वळून वर बघितलं तर तीच मुलगी होती ती. पण आत्ता तिचा चेहरा खूपच प्रसन्न, हसरा आणि गोड दिसत होता. जणू कांही एक बाहुलीच.
चेह-यावरचं एक्स्प्रेशन एवढं बदलणं कसं काय जमत असावं हिला?

मी तिला नजरेनेच ‘काय?’ म्हणून विचारले.
‘प्लीज कम हिअर’
‘सॉरी..’ हिला आत्ताच भेटायला नको म्हणून मी म्हणालो, ‘पुन्हा कधीतरी येईन... नाहीतर मनिषाबरोबर माझ्या ऑफीसवर ये... You missed today’s opportunity… बाय इशा...’
इशा हे नाव उच्चारताच ती माझ्याकडे आश्चर्यानं बघू लागली. मी तिला हसत ‘टाटा’ केला आणि होस्टेलच्या गेटमधनं बाहेर पडलो.

+++

इशा धावतच तिच्या रूममध्ये गेली.. तिनं मनिषाला विचारलं, ‘तू त्या सांगलीकरांना माझ्याबद्दल काय सांगितलस? त्यांना माझं नाव कसं काय माहीत?’
‘मी कांहीच नाही बोलले तुझ्याबद्दल. तुझा विषय पण नाही निघाला. ... कमाल आहे... त्यांनी माझं पण नाव ओळखलं होतं....’

इशा तिच्या कॉटवर बसली. विचार करू लागली. अचानक तिचं लक्ष समोरच्या भिंतीवरल्या चित्रांकडे गेलं. उत्तेजित होत ती म्हणाली, ‘ते बघ मनिषा, तुझं नाव त्या चित्राखाली आहे’
‘पण ती चित्रं मी काढली आहेत हे त्यांना काय माहीत?’ मनिषानं विचारलं.
‘आणखी एखादा क्ल्यू मिळाला असेल त्यांना...’, विचार करत इशा म्हणाली, ‘मला सांग, इथं आल्यावर त्यांनी कोणत्या गोष्टी हातात घेतल्या होत्या?’
मनिषा आठवू लागली आणि टेबलावरल्या आर्ट ऑफ इंडिया या पुस्तकाकडे बोट दाखवत म्हणाली,  ‘ते पुस्तक... पण त्याच्यावर माझं नाव लिहिलेलं नाहीय’
इशानं विचारलं, ‘ते रूममध्ये आले तेंव्हा त्यांच्याबरोबर कोण होतं?’
‘पाटील मॅडम’
‘मॅडमनी तुला नावानं हाक मारली का?’
‘.... मने अशी हाक मारली होती’
‘आत्ता कळलं का तुला? .... मने ... मनिषा...?’
‘बरोबर, पण इशा, त्यांनी तुझं नाव कसं काय ओळखलं? कसलाच क्ल्यू नसताना?’
‘हे आता त्यांनाच विचारायला पाहिजे... मला त्यांचा फोन नंबर दे पटकन’

ईशाने लगेच मला फोन लावला... तिनं हॅलो म्हणायच्या आतच तिला माझा आवाज ऐकू आला,
‘बोल इशा...’
तिला आश्चर्याचा दुसरा झटका बसला. ‘ओ माय गॉड.... हा माझा फोन नंबर आहे हे तुम्हाला कसं काय माहीत? आणि हा तर माझा सिक्रेट नंबर आहे... आणि मुळात माझं नाव तुम्हाला  कळलं कसं?’ ती उत्तेजित होऊन म्हणाली.

‘हे तूच शोधायचं आहेस. मी मनिषाचं नाव कसं ओळखलं ते तू शोधून काढलास ना आत्ताच? तसं हे पण शोधून काढ आता’ असं म्हणून मी फोन कट केला.

तिला बहुधा तिचे सगळेच देव आठवले असणार आता...

दुसरा भाग: गर्ल्स होस्टेल 2

हेही वाचा: 
गौरी आणि फेस रीडर 
दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा