Advt.

Advt.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

गर्ल्स होस्टेल 2

-महावीर सांगलीकर


मी कॅप्टन विक्रम सिंग याला बालगंधर्वच्या शेजारच्या एका हॉटेलमध्ये यायला सांगितलं होतं. तिथं मी गेलो तर अगदी त्याच वेळी तो तिथं आला. तो मिस्टर पंक्चुअल होता. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी हजर. दोन मिनिटं आधी नाही की दोन मिनिटं उशीरा नाही. ट्रॅफिक जाम होते, मीटिंग होती, झोपलो होतो असले बहाणे त्याच्याकडून ऐकायची पाळी माझ्यावर कधीच येत नसे. 

त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न असे. त्यावर टेन्शनच्या कसल्याही खाणाखुणा दिसत नसत. ‘टेन्शन देना नहीं और टेन्शन लेना भी नहीं’ असं तो नेहमी म्हणत असे.

कॅप्टन विक्रम सिंग.. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधनं आर्मीत गेला आणि चार पाच वर्षातच रिटायरमेंट घेऊन परत आला. तोपर्यंत त्याच्या नावावर बरीच पदकं आणि पराक्रम जमा झाले होते. सध्या पुण्यात एक इंडस्ट्रीअल सिक्युरिटी अॅण्ड डिटेक्टिव्ह एजन्सी चालवत असे. बक्कळ पैसा मिळत असे, पण त्या कामात त्याला फारसा इंटरेस्ट नव्हता. त्याच्या हाताखालचे लोक ती एजन्सी व्यवस्थित चालवत असत.

आम्ही दोघं हॉटेलमधल्या एका टेबलावर जाऊन बसलो.
मी त्याला विचारलं, ‘काय घ्यायचं?’
‘फक्त चहा’

त्याच्यासाठी चहापेक्षा काम महत्वाचं होतं. डायरेक्ट कामाचं बोललेलं त्याला आवडत असे. वेळ वाया घालवणे, आपल्याशी संबंध नसलेल्या, नसत्या विषयावर चर्चा करणे त्याला अजिबात आवडत नसे. क्रिकेट आणि पॉलिटिक्स या गोष्टींची त्याला माझ्यासारखीच अॅलर्जी होती.

मी त्याला कामाची थोडक्यात कल्पना देऊ लागलो. मनात म्हंटलं, हा हे काम स्वीकारणार आहे. लगेच होकार देईल.

‘डन’, तो ते काम ऐकल्यावर लगेच म्हणाला, ‘रुटीन काम करून बोअर झालोय यार. हे काम इंटरेस्टिंग वाटतंय’

‘आणि चॅलेंजिंग देखील’ मी हसत म्हणालो.

‘माझ्यासाठी हे काम अजिबात चॅलेंजिंग नसेल, कारण मी अशा प्रकारचे काम या आधी केलं आहे. आर्मीत असताना. तिथं ज्या मुलींचा मी सामना केला, त्यापुढे या सिव्हिलिअन मुली किरकोळ आहेत. जस्ट चेंज म्हणून हे काम स्वीकारतोय’ 

तेवढ्यात माझ्या मोबाईल फोनची रिंग वाजली. विक्रम सिंगला ‘एक मिनिट’ म्हणत मी फोन घेतला.
‘बोला मॅडम, का फोन केलात?’
‘मला मॅडम म्हणत जाऊ नका सर. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. मॅडम म्हटलं तर कसं तरीच वाटतं’
‘ओके इशा, बोल काय म्हणतेस?’
‘मी शोधून काढलं, तुम्ही मघाशी होस्टेलमध्ये आला होता तेंव्हा माझं नाव कसं शोधून काढलं ते’
‘तू ओळखणार हे मला ठाऊक होतं. पण तूच सांग तू कसं ओळखलंस?’
‘तुम्ही परत जाताना होस्टेलच्या ऑफीसमध्ये गेलात त्यावेळी तिथं तुम्हाला होस्टेलच्या पत्त्यावर आलेली पत्रे दिसली. त्यातलं एक पत्र माझ्या नावाने होतं.... इशानी सिंग, रूम नंबर 4, गर्ल्स होस्टेल. मी रूम नंबर चारमध्ये रहाते हे तुम्हाला माहीतच होतं, मग काय सोपंच आहे की माझं नाव ओळखणं’ 
‘छान.... हुशार आहेस तू’
‘पण तुम्हाला माझा सिक्रेट फोन नंबर कसा मिळाला?’ तिनं तिला पडलेला प्रश्न विचारला.
‘ते एक सिक्रेट आहे, आणि कांही सिक्रेटस लपवूनच ठेवायची असतात’
‘सांगा ना सर... प्लीज’
‘सॉरी’
‘ओके, मी काढेन शोधून. वेल, सर आत्ता तुम्ही हॉटेलमध्ये चहा पीत आहात ना?’ तिनं विचारलं. इशानी इथेच कुठंतरी असल्याची शंका आल्याने मी लगेच इकडं तिकडं बघितलं, पण इशानी कुठं दिसली नाही.
‘नाही,’ मी थाप मारली, ‘मी मित्राच्या ऑफिसमध्ये आहे’
‘कशाला खोटं बोलता सर’ ती म्हणाली, ‘तुम्ही आणि तुमचा मित्र हॉटेलमध्ये चहा पीत आहात’
मी सावधपणे पुन्हा एकदा सगळीकडे बघितलं. मग म्हणालो, ‘तू जरा जास्तच हुशार दिसतेस. मी हॉटेलमध्ये आहे हे तू कसं ओळखलंस ते माहीत आहे मला’
‘कसं?
‘हॉटेलमधल्या पब्लिकचा आवाज, बोलणं ऐकू येत असणार तुला. त्यांनी दिलेल्या ऑर्डर्सचे आवाज, वेटर्सचे बोलणे... बरोबर ना?’
‘करेक्ट.. पण तुम्ही चहा पीत आहात हे कसं काय ओळखलं मी?’
‘मी चहा प्यायला तुझ्या खोलीत आलो होतो हे तुला माहीत आहे. त्यावरनं मी चहाचा शौकीन असणार असा तू अंदाज केलास. त्यामुळं हॉटेलमध्ये मी चहाच पीत असणार हे तू ओळखलस’ 
‘आणि तुम्ही तुमच्या मित्राबरोबर आहात हे?’
‘ते मला कळलं नाही. कसं काय ओळखलंस?’
‘ते एक सिक्रेट आहे. आणि तुम्हीच म्हणालात, कांही सिक्रेटस लपवूनच ठेवायची असतात? म्हणून मी ते लपवूनच ठेवणार आहे. बाय..’ असं म्हणत तिनं फोन कट केला.

माझं फोनवरचं बोलणं कॅप्टन विक्रम सिंग लक्ष देऊन ऐकत होता. फोन बंद झाल्यावर तो म्हणाला, ‘जिनिअस मुलगी दिसतेय’

‘होय, जरा जास्तच. तुझी गाठ पडेल लवकरच तिच्याशी’ मी म्हणालो.
त्यानं कांही विशेष उत्साह दाखवला नाही.
‘चलो बॉस, मैं चलता हूं अब’ आपल्या जागेवरनं उठत तो म्हणाला.
‘अजून एक चहा घेणार का?’,

‘नको, तू घे’ असं म्हणून तो निघून गेला.

थोड्या वेळानं मी माझ्या जागेवरनं उठलो आणि हॉटेलमधल्या टॉयलेटला गेलो. परत येऊन बघतो तर मी जिथं बसलो होतो तिथं एक मुलगी बसली होती. त्यावेळी हॉटेलमध्ये बसायला दुसरं मोकळं टेबल नव्हतं, म्हणून मी तिला म्हणालो, ‘एक्सक्यूज मी,  इथं मी बसलो होतो....’
‘काका, तुम्ही समोर बसा प्लीज..’ ती समोरच्या खुर्चीकडं बोट दाखवत माझ्याकडं न बघता म्हणाली.
मी तिच्या समोर बसलो. तिचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मी नेहमीच्या सवयीप्रमाणे तिचा चेहरा वाचायला सुरवात केली.

सुंदर आणि आकर्षक. जिनिअस... क्विक थिंकर बट क्रिटीसायझर. ओव्हर एक्स्प्रेसिव्ह. एक्स्ट्रोव्हर्ट. फटकळ असावी. हिच्या नंबर चार्टमध्ये चार आणि पाच हे दोन्ही नंबर असले पाहिजेत.

ती काळजीत दिसत होती आणि कसला तरी विचार करत होती. तिचा चेहरा पार उतरला होता. प्रॉब्लेममध्ये असावी कुठल्या तरी.

‘इफ यू डोंट माइंड, मे आय हेल्प यू?’ मी तिला विचारलं.

तिनं कांही न बोलता माझ्याकडे बघितलं आणि परत नजर फिरवून विचारात गढली.

‘तुझा प्रॉब्लेम मी सोडवू शकतो. कसलाही.  तू मला काका म्हणालीस ना? मग आता मोकळेपणानं सांग काय झालंय ते’

तिनं पुन्हा एकदा माझ्याकड बघितलं, पण न बोलता शांत राहिली.

ही सांगणार हिचा प्रॉब्लेम आता, मी मनात म्हणलो.

‘काका, मी एके ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून रहाते. पण मला तिथं अजिबात शांतता मिळत नाही. त्या फॅमिलीत सारखी भांडण आणि आरडा-ओरडा चालू असतो. काय पण एकेक फॅमिली असते. सुखानं, आनंदानं जगावंच वाटत नाही कुणाला. मला बाहेर पडायचं आहे तिथनं. ताबडतोब. पण लगेच दूसरीकडं जागा मिळणं अवघड आहे...’
‘चल, मी दिली तुला जागा मिळवून.. पण आधी मला सांग, तुझं नाव काय? तुझं गाव कुठलं? तू काय करतेस?’
‘मी प्रियांका पाटील. मुळची साता-याची आहे. मला लिखाणाची आवड आहे. पण माझी आई, बाबा, दादा या सगळ्यांचाच माझ्या लिखाणाला प्रचंड विरोध आहे.  मला लेखिका म्हणून प्रसिद्ध व्हायचं आहे. घरच्यांचा विरोध होतोय म्हणून मी घरातनं निघून पुण्याला आले’ 
‘कमाल आहे. अनेक मुली हिंदी सिनेमात काम करण्यासाठी  मुंबईला पळून जातात, तू लेखिका होण्यासाठी पुण्याला पळून आलीस...’
‘मी पळून नाही आले. घरी सांगून लग्झरी बसनं आरामशीर आले..’ हे म्हणताना तिच्या चेह-यावर उदास हसू उमटलं.
‘ठीक आहे, पण तुझं उत्पन्नाचं साधन काय? मी तुला जिथं जागा मिळवून देणार आहे तिथलं महिन्याचं भाडं तीन हजार आहे. वर्षाचं पूर्ण भाडं आधी द्यावं लागतं तिथं. ते तू कसे देणार?’
‘वेल, आय एम पाटील... रिअल पाटील. आय हॅव प्लेंटी ऑफ मनी अॅण्ड आय कॅन मॅनेज मोअर’
हिनं घरून येताना भरपूर पैसे आणले की काय? पण नाही, ही तसं करणार नाही, मी मनात म्हणालो.
‘मी घरून येताना माझ्या एका मैत्रिणीकडण पाचशे रुपये उसने आणले होते, प्रवास खर्चाला आणि इतर खर्चाला. घरातनं एक पैसा पण घेतला नाही. मैत्रिणीकडणं घेतलेले पैसे दोनच दिवसात परत पाठवून दिले’
.... माइंड रीडर?
‘छान.... पण तू काम काय करतेस इथं?’
‘मी एका जाहिरात एजन्सीत पार्ट टाईम काम करते... आय एम अ कॉपी रायटर. शिवाय ट्रान्सलेशनची कामं पण करते’
‘अच्छा... ठीक आहे... इथं एक मुलींचं होस्टेल आहे. एकदम शांत एरियात. कालच एक मुलगी तिला बेंगलोरला जॉब मिळाला म्हणून होस्टेल सोडून गेलीय... तिची जागा तुला मिळू शकेल..’
‘जागा मिळेल, पण शांतता मिळेल का? मला माझं लिखाण करण्यासाठी’ तिनं विचारलं.
‘हो... सध्या जिथं तू राहतेस तिथल्यापेक्षा नक्कीच’ असे म्हणत मी मावशीला फोन लावला,
‘मावशी, एका मुलीला होस्टेलमध्ये जागा पाहिजे. पाठवू का?’
‘पाठव, पण कोणाचा तरी रेफरन्स पाहिजे आणि तिचे डॉक्यूमेंट्स पण पाहिजेत... आयडेंटिटी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ वगैरे.
‘हो मिळेल सगळं’ असं म्हणत मी फोन कट केला आणि प्रियांकाला म्हणालो, ‘झालं तुझं काम’
‘थॅंक्स’
‘सध्या तू काय लिहित आहेस?’ मी विचारलं.
‘एक नॉव्हेल लिहीत आहे... मराठी. निवांत वेळ मिळाला तर सहा महिण्यात पूर्ण होईल’
‘विषय?’
‘एका जिद्दी मुलीची फरफट आणि विजय हा विषय आहे...’
‘इंटरेस्टिंग’
’पण काका, तुम्ही काय करता ते सांगितलं नाही?’
‘मी तुझ्यासारख्या जिनिअस मुलींचे प्रॉब्लेम्स सोडवतो आणि त्यांना मोटीव्हेट करतो’
‘ग्रेट... ‘

+++

दुस-या दिवशीची गोष्ट. इशानी तिच्या मोपेडवरनं वेगात चालली होती. तेवढ्यात एक तरुण त्याच्या मोटर सायकलवरनं तिच्या मागून तिच्यापेक्षा वेगात आला आणि पुढं निघून गेला. असं कुणी आपल्या पुढं निघून जाणं इशानीला बिलकुल आवडलं नाही. त्या तरुणाचा पाठलाग करावा असं तिला वाटलं, पण तिनं तो विचार लगेच सोडून दिला. तिच्या शार्प मेंदूनं त्या मोटर सायकलचा नंबर, रंग आणि त्या तरुणाची फिगर यांची नोंद घेतलीच होती. 

एवढ्यात ती मोटरसायकल समोरून परत वेगाने आली. त्या तरुणाला बघून इशानी चवताळली. जोरात ओरडली, ‘ए... रुको...’ पण तो तरुण तसाच पुढे निघून गेला. इशानीने त्याचा पाठलाग सुरु केला. हा पाठलाग करण्याचं तिच्या सुप्त मनातलं खरं कारण वेगळंच असावं. तो तरूण अतिशय रुबाबदार, हॅंडसम आणि तिला शोभेल असा होता. तो तिला मनातनं आवडला असावा. 

पुढच्याच चौकात ती त्याला गाठणार तेवढ्यात रेड सिग्नल लागला. तोपर्यंत तो तरुण चौक पार करून गेला होता. इशानीने रेड सिग्नलची पर्वा न करता आपली मोपेड वेगानं पुढे दामटली. या गडबडीत तिची गाडी स्लीप झाली आणि ती जोरात बाजूला फेकली गेली. बेशुद्ध पडली. लोक गोळा झाले. पण सगळेच बघे, कोणी तिच्या मदतीला धावले नाही.

एवढ्यात मघाचा तो तरुण तिथं आला, लोकांना बाजूला सारत तिच्याजवळ गेला. त्यानं आधी दोन ठिकाणी फोन लावले. अॅम्ब्यूलन्स आणि पोलीस स्टेशन. मग तो खाली बसला, त्यानं तिच्या नाकाजवळ आपली बोटे नेली, गळ्याची नस तपासून बघितली.

थोड्याच वेळात एक अॅम्ब्यूलन्स आली. पाठोपाठ पोलीस व्हॅनही आली. पोलिसांनी बघ्यांना बाजूला सारले. एका पोलीस इन्स्पेक्टरने त्या तरुणाच्या जवळ जाऊन विचारले, ‘तुम्ही कोण?’ तेंव्हा त्या तरुणाने त्याला आपले आयकार्ड काढून दाखवले. ते बघताच तो इन्स्पेक्टर त्याच्याशी मोठ्या अदबीने वागू लागला.

मग त्या तरुणाने इशानीला आपल्या दोन्ही हातांनी उचलले आणि अॅम्ब्यूलन्समध्ये ठेवले. तो स्वत:ही आत बसला. अॅम्ब्यूलन्स सायरन वाजवत वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.

इशानीला एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

बेशुद्ध पडण्याव्यतिरिक्त इशानीला दुसरं कांहीच झालं नव्हतं.

ती शुद्धीवर आली त्यावेळी तिच्या समोर पाटील मॅडम आणि मनीषा होत्या. तिच्या इतर कांही मैत्रिणीही आल्या होत्या.
शुद्धीवर आल्यावर इशानीनं पहिला प्रश्न विचारला, ‘माझी गाडी कुठाय?’
तिचा हा प्रश्न ऐकून सगळ्यांना हसू आले. मनीषा म्हणाली, ‘तुझी गाडी सुरक्षित आहे. तिला साधं खरचटलं देखील नाही. आणि तुला पण कांही झालेलं नाही’

‘थॅंक गॉड!’ असे म्हणत तिनं आपले डोळे झाकले आणि झोपी गेली.


पहिला भाग: गर्ल्स होस्टेल 

हेही वाचा:
 अंजलीना ब्यांडची कथा 
कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा