Advt.

Advt.

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

मराठी सिनेमा: कोर्ट

-महावीर सांगलीकर


कोर्ट हा मराठी सिनेमा आपण अजिबात बघायचा नाही हे मी त्याचे पोस्टर बघूनच ठरवले होते, कारण त्या सिनेमात काय असणार याचा मला अंदाज आला होता. पुढे पेप्रातले परीक्षण वाचून माझी पक्की खात्री झाली की माझ्या साठी हा ‘न बघण्यालायक’ सिनेमा आहे. पण माझ्या वकील मुलीच्या आग्रहामुळे मला तिच्याबरोबर हा सिनेमा बघायला जावे लागले.

सिनेमा सुरू झाल्यावर थोड्याच वेळात तिने सिनेमातल्या दृश्यांवर आक्षेप घ्यायला सुरवात केली... कोर्टात हे असे नसते.... जज असे म्हणत नसतो... असे कुठे असते काय?.... काय रटाळ पिक्चर आहे... मी झोपते, इंटर्वल झाल्यावर मला उठवा...... असे म्हणून ती खरेच झोपी गेली! इंटर्वलला जागी झालेली ती परत सिनेमा सुरू झाल्यावर पुन्हा झोपी गेली.

कोर्ट हा विद्रोही मानसिकतेच्या लोकांनी त्यांच्यासारख्याच मानसिकतेच्या लोकांसाठी बनवलेला सिनेमा आहे. ही ‘आर्ट फिल्म’ असल्याने अर्थातच रटाळ आहे. कथेला वेग नाही, कारण तिला दोन तास लांबवायाचे आहे. 

या सिनेमाच्या कथेतून एवढेच दिसते की विद्रोही फिलॉसॉफीत शोषित समाजाच्या आर्थिक आणि भौतिक उन्नतीला कसलेही स्थान नाही, शोषित समाजाच्या अवस्थेला तथाकथित शोषक समाज जबाबदार आहे आणि या तथाकथित शोषक समाजाला लाईफ एन्जॉय करण्याचा कसलाही अधिकार नाही (कारण आम्ही लाईफ एन्जॉय करत नाही, मग त्यांनी तरी का करावे?).

हा सिनेमा पाहून मला पडलेले गहन प्रश्न:

● श्रीमंत आणि बनिया हे तर मोठे शोषक आहेत असे विद्रोही फिलॉसॉफी ओरडून सांगत असते! मग या सिनेमातल्या विद्रोही शाहिराचा वकील अतिश्रीमंत घरातला आणि बनिया का? विद्रोह्यांच्या शेकडो संघटनांतून या शाहिराला एखादा विद्रोही वकील का नाही मिळाला?

● हे विद्रोही शाहीर दाढी का वाढवत असतात? त्यांची रहाणी कळकट मळकट का असते?

● विद्रोही गाणी लिहिणे, ती तारस्वरात ओरडणे या ऐवजी तथाकथित शोषित समाजाची आर्थिक आणि भौतिक उन्नती करणे ही गोष्ट महत्वाची आहे हे या विद्रोह्यांना कधी कळणार?

●  या सिनेमातील अनेक दृश्यांवरून असे दिसून येते की लाईफ एन्जॉय करणे या प्रकाराला विद्रोह्यांचा प्रचंड विरोध दिसतो. आम्ही एन्जॉय करू शकत नाही तर तुम्हीही एन्जॉय नाही केले पाहिजे! हा विचार तर एक विकृतीच वाटते.

● या सिनेमात समाजाची जातीय विभागणी मोठ्या खुबीने कम्युनिस्ट पेहरावात म्हणजे वर्गव्यवस्थेत दाखवली गेली आहे. सिनेमात निळ्या रंगाचा अतिरेकी आणि नको तिथे वापर केलेला दिसतो. एक दृश्यात तर जज आणि त्याची मित्रमंडळी, जे सगळे उच्चवर्णीय आणि उच्च वर्गीय आहेत, निळ्या रंगाच्या बसमधनं ट्रीपला गेलेले दाखवले आहेत!  

●  मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांनीदेखील विद्रोही विचारांचे पाईक व्हावे अशी अपेक्षा ठेवणा-यांना काय म्हणावे? जगातून कम्युनिझम संपला, पण अजूनही कम्युनिस्ट युगात
वावरणा-या या विद्रोहींची कीव करावी तेवढी थोडीच आहे. हा सिनेमा ज्यांना आवडला त्या समीक्षकांचे आणि पेपरवाल्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हे लांगूल चालन की गिल्टी फिलिंग? (प्रेक्षकांचे जाऊ द्या.... ते या सिनेमाचे कौतुक करतात आणि भांडवलदारांनी आयोजित केलेली क्रिकेट मॅच देखील तेवढ्याच आवडीने बघत असतात). अर्थात अंदर की बात वेगळीच असते हेही मला माहीत आहे, कारण खाजगीत हे समीक्षक वेगळेच बोलत असतात!

● सध्या मराठी सिनेमात ब्राम्हणविरोधी आणि ब्राम्हणी सिनेमांची चलती आली आहे. असे सिनेमे चांगले चालतात. कोर्ट या सिनेमानेही भरपूर पैसे कमवले आहेत. आता इथे प्रश्न असा येतो की सिनेमा काढून त्यातनं पैसे कमावणे हे कोणत्या विद्रोही तत्वज्ञानात बसते? मार्क्सच जाणे!

शेवटी माझ्यासाठी (तरी) मराठी सिनेमे न बघणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे!


हेही वाचा:
विद्रोह घाला चुलीत.....
वाचक
एका बदल्याची गोष्ट
मस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा