Advt.

Advt.

गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५

व्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव

- महावीर सांगलीकर 
  

चला, मी आज तुम्हाला एका अर्धवट रावांची ओळख करून देतो. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना कोणतीही गोष्ट पटकन कळत नाही. त्याचं कारण म्हणजे ते समोरचा माणूस काय म्हणतो ते नीट ऐकून घेत नाहीत. समोरचा काय सांगतो ते नीट ऐकून घेण्याऐवजी त्यांचं लक्ष इकडं तिकडंच असते. (शाळेत असताना हे एकदम मागच्या बाकावर बसायचे आणि शिक्षक काय सांगतात या ऐवजी त्यांचं लक्ष खिडकीबाहेरच असायचं. त्यामुळे त्यांना प्रत्येक वर्गात दोन-दोन वर्षे काढावी लागली).

बरं, जसं यांना नीट ऐकून घेता येत नाही, तसंच ते कोणतीही गोष्ट नीट वाचत नाहीत. त्यामुळं त्यांना वाचलेलंही नीट कळत नाही. लिहिण्याविषयी काय बोलावं? यांना चार छापील ओळी जशाच्या तशा लिहून  काढा म्हंटलं तर ते त्यात दहा चुका करतात! त्यांची मायबोली मराठी असूनही त्यांना ती नीट वाचता येत नाही, मग हिंदी आणि इंग्रजीची बातच सोडा. हिंदी सिनेमे बघून बघून त्यांना टूटी-फूटी हिंदी बऱ्यापैकी बोलता येते, पण हिंदी वाचायला जमत नाही. (मराठी वाचायला जमत नाही, तर हिंदी कसं जमेल? लिपी एक असली म्हणून काय झालं?). आपल्याला इंग्रजी अजिबातच बोलता येत नाही याचा त्यांना मोठा अभिमान आहे, कारण त्यांच्या डोक्यात अनेकांनी भरवलं आहे की मराठी माणसाने मराठीच बोलायला पाहिजे. (असे विचार भरवणाऱ्यांची पोरं इंग्रजी शाळेत शिकत असतात, ही पोरं त्यांच्या घरात देखील इंग्रजीत बोलत असतात!). इंग्रजी जमत नाही म्हणून तिचा द्वेष करणारे हे महाशय आपली गिचमिड सही मात्र इंग्रजीत करतात! असो.

यांच्या हातात नेहमी स्मार्ट फोन असतो. सारखं व्हाट्स अॅपकडं लक्ष असतं. आला मेसेज की कर फॉरवर्ड असा उद्योग दिवस भर चालू असतो. हे फॉरवर्ड करणंसुद्धा मेसेज न वाचताच होत असतं. एकदा यांच्या एका मित्रानं यांची इज्जत काढणारा एक मेसेज यांना पाठवला होता. या महाशयांनी नेहमीप्रमाणे तो न वाचताच अनेक लोकांना फॉरवर्ड केला. स्मार्ट फोन घेतल्यापासून यांना स्वत:चा असा एकही मेसेज तयार करता आला नाही. स्वत:चे विचार नसले तर दुसरं काय होणार?

हे जेंव्हा सिनेमा बघतात त्यावेळीही त्यांचे लक्ष पडद्याकडे नसते, तर व्हाट्स अॅपकडंच असतं. त्यामुळं त्यांना सिनेमाही नीट कळत नाही.

कोणी महत्वाचं भेटायला आले असेल, किंवा हे कुणाला भेटायला गेले असतील आणि समोरच्याशी बोलणं चालू असेल, तेवढ्यात एखादा फोन आला तर हे महाशय समोरच्या व्यक्तिशी चाललेलं बोलणं बंद करून फोनवरच्या व्यक्तिशी बोलत बसतात.

यांना आपला पत्ता नीट सांगता येत नाही आणि दुसऱ्याने नकाशासहित डिटेलमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोहचता येत नाही. यांना आपलं नावही नीट सांगता येत नाही. नाव विचारलं तर आडनाव सांगतात.

लोकलनं प्रवास करताना हे नेहमी दारात उभं राहून प्रवास करतात. प्रत्येक स्टेशनाला उतरणारे लोक यांना ढकलून उतरतात, पण यांची दारात उभं रहायची सवय कांही जात नाही.

आता राहिली कॉमन सेन्सची बात. त्यांनी आयुष्यात तो कधीच वापरला नाही. कारण सेन्सच नसेल तर कॉमन सेन्स कुठून येणार?
(असे अर्धवट राव तुमच्याही पहाण्यात आले असतील!)

हेही वाचा:
वाचक
संगतीचा परिणाम
एका बदल्याची गोष्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया पुढील पेज लाईक करा:

मोस्ट पॉप्युलर कथा